Eid E Milad: मुंबईकरांनो लक्ष द्या! ईद-ए-मिलादनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ मार्गांवर प्रवेशबंदी, पाहा पर्यायी मार्ग

ईद-ए-मिलादनिमित्त 26 ऑगस्टला जोगेश्वरी पश्चिम परिसरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत प्रमुख मार्गांवर निर्बंध राहणार असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन आहे.

Eid E Milad: मुंबईकरांनो लक्ष द्या! ईद-ए-मिलादनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ मार्गांवर प्रवेशबंदी, पाहा पर्यायी मार्ग

मुंबई: ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम परिसरात वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. 26 ऑगस्ट रोजी मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने भाविक जमा होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांकडून काही रस्त्यांवर वाहतूक बंद करण्यात येणार आहे. हे निर्बंध दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील.

एस.व्ही. रोडवरील ए-1 दरबार हॉटेल जंक्शन ते अंबोली नाका या परिसरात मिरवणुकीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एस.व्ही. रोड, रिलिफ रोड, ठाकरे ब्रिज रोड आणि कॅप्टन सावंत मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध असतील.

एस.व्ही. रोडवर ओशिवरा नाला ते अंबोली नाका या दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. रिलिफ रोडवर आनंद नगर जंक्शन ते ए-1 दरबार हॉटेल जंक्शनपर्यंत वाहनांना प्रवेश करता येणार नाही. तसेच ठाकरे ब्रिज रोडवरील जेव्हीएलआर जंक्शन ते एस.व्ही. रोड आणि कॅप्टन सावंत मार्गावरील गुंडेचा जंक्शन ते एस.व्ही. रोड या मार्गांवरही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा: Mumbai Mega Block Update : ऐन सुट्टीच्या दिवशी होणार मनस्ताप! रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम मार्गावर उद्या मेगाब्लॉग; हार्बर मार्गावरील फेऱ्याही पाच तास बंद

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

गोरेगाव पश्चिमेकडून ए-1 दरबार हॉटेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मिरनलताई गोरे फ्लायओव्हरमार्गे पश्चिम द्रुतगती महामार्गाचा वापर करता येईल. अंधेरी पश्चिमेकडून बेहरामबागच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी सीझर रोड किंवा जे.पी. रोड जंक्शनमार्गे लिंक रोड हा पर्यायी मार्ग उपलब्ध असेल.

ओशिवरा लिंक रोडवरून येणाऱ्या वाहनांना काजूपाडा जंक्शनवरून बेहरामबाग आणि शास्त्रीनगर रोडच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. जेव्हीएलआर जंक्शनकडून एस.व्ही. रोडकडे जाणाऱ्या वाहनांना पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे वळवण्यात येईल.

कॅप्टन सावंत मार्गावरून येणाऱ्या वाहनांना डी.एन. नगर मेट्रो स्थानकाच्या दिशेने किंवा गुंडेचा जंक्शनवरून लिंक रोडचा पर्याय वापरता येणार आहे.

दरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या वाहतूक निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी 26 ऑगस्ट रोजी घराबाहेर पडताना या बदलांची नोंद घ्यावी आणि शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number