मुंबई: शीव परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतीक्षानगर येथील माला उद्यानात नागरिकांच्या विश्रांतीसाठी उभारण्यात आलेल्या गझिबोचे छप्पर अचानक कोसळल्याने पाच जण जखमी झाले. बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींमध्ये सर्वाधिक वयस्कर नागरिकांचा समावेश असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विश्रांती घेत असतानाच दुर्घटना
माला उद्यानात दररोज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. उन्हापासून बचाव आणि विश्रांतीसाठी उद्यानात काही वर्षांपूर्वी गझिबो उभारण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी काही वृद्ध नागरिक याच ठिकाणी बसले होते. त्याचवेळी अचानक गझिबोच्या छताचा भाग खाली कोसळला. छप्पर कोसळताच त्याखाली बसलेले नागरिक अडकले. दुर्घटनेचा आवाज ऐकून उद्यानातील इतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी मदत करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य करून जखमींना बाहेर काढण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत धोंडीराम खोपकर (65), गणपत आंबोले (79), प्रमिला जाधव (68), लक्ष्मी शितलीय (65) आणि सुनीता मोरे (65) हे पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शीव रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
गझिबोच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
उद्यानात नागरिकांच्या विश्रांतीसाठी उभारण्यात आलेल्या बांधकामाचा भाग अचानक कोसळल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे बांधकाम किती जुने आहे, त्याची नियमित तपासणी आणि देखभाल करण्यात आली होती का, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, दुर्घटनेमागचे नेमके कारण संबंधित तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.