Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या (NH-66) रखडलेल्या कामाबाबत कोकणवासीयांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सरकारने आता नवी डेडलाईन निश्चित केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, माणगाव आणि इंदापूर बायपास वगळता उर्वरित महामार्गाचे काम आगामी मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पुढील गणेशोत्सवापूर्वी मार्ग सुखकर होणार
आमदार निरंजन डावखरे यांनी महामार्गाच्या संथ गतीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी आश्वासक माहिती दिली. 'अटल सेतू' आणि 'समृद्धी महामार्ग' यांसारखे मोठे प्रकल्प पूर्ण झाले असले तरी मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. यावर स्पष्टीकरण देताना भोसले म्हणाले की, या प्रकल्पातील कंत्राटदार काम करत नसल्याने जुन्या एजन्सीकडून काम काढून घेऊन नव्या एजन्सीला देण्यात आले आहे. पुढील गणेशोत्सवाआधी संपूर्ण महामार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.
माणगाव-इंदापूर बायपास आणि रेल्वे उड्डाणपूल
माणगाव व इंदापूर बाह्यवळण मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पात 3 रेल्वे उड्डाणपूल आणि 2 मोठ्या पुलांचा समावेश आहे. ही विशेष कामे जुलै 2025 मध्ये सुरू करण्यात आली असून ती जुलै 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तथापि, माणगाव-महाड मार्गावरील ताम्हिणी घाटाचा बाह्यवळण मार्ग पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मे 2026 पर्यंत पूर्ण झाल्यास माणगाव शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल.
अवजड वाहतुकीचा अडथळा आणि कोंडीचे सावट
महामार्गाचे काम सुरू असतानाच रायगड जिल्ह्यात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांना बंदी घातली असली तरी, अनेक वाहनचालक या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. अलिबाग-रोहा मार्गावर कुरुळ ते सुडकोली आणि रेवदंडा बायपास भागात सध्या क्रॉस ड्रेन आणि गटारांची कामे सुरू असल्याने पर्यटकांना आणि स्थानिकांना तासनतास कोंडीत अडकावे लागत आहे. शनिवारी सहाण ते बेलकडे दरम्यान झालेली कोंडी पाहता, वाहतूक यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
प्रकल्पाचा प्रगतीपथावरील आराखडा
नव्या एजन्सीने माणगाव बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम हाती घेतले असून ते आता प्रगतीपथावर आहे. सरकारने या महामार्गासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. मे महिन्यात मुख्य मार्गिका सुरू झाल्यास कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यास कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.