मुंबईत दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असताना विविध भागांमध्ये गोविंदा पथकांमध्ये थर रचण्याची चुरस पाहायला मिळत आहे. लाखोंच्या बक्षिसांसाठी गोविंदा पथके नऊ-दहा थरांचे मानवी मनोरे रचत हंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि मंडळांकडून मोठ्या दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले असून, सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे उत्सवाला आणखी रंगत आली आहे. घाटकोपरसह मुंबईतील अनेक भागांमध्ये सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
मात्र, दहीहंडीच्या या उत्साहाला काही ठिकाणी अपघातांचे गालबोट लागले आहे. मानवी मनोरे रचताना अनेक गोविंदा खाली पडून जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आतापर्यंत मुंबईत 188 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी गोविंदांवर शहरातील विविध शासकीय आणि मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान, मालाडमध्ये दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे उत्सवाच्या आनंदावर शोककळा पसरली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असला, तरी वाढत्या थरांमुळे आणि मोठ्या बक्षिसांच्या स्पर्धेमुळे गोविंदांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.