Mumbai Air Pollution: श्वास घेणंही कठीण! मुंबईतील हवा आरोग्यासाठी घातक, प्रदूषणाने ओलांडली धोक्याची मर्यादा

मुंबईत हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली असून अनेक भागांत AQI 200 च्या वर गेला आहे.

Mumbai Air Pollution: श्वास घेणंही कठीण! मुंबईतील हवा आरोग्यासाठी घातक, प्रदूषणाने ओलांडली धोक्याची मर्यादा

मुंबई: मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये वाढत चाललेले वायू प्रदूषण हा आता केवळ पर्यावरणाचा नाही, तर थेट सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. विशेषतः मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून अनेक भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 200 च्या पुढे गेला आहे. ही स्थिती ‘अस्वस्थ’ ते ‘घातक’ श्रेणीत मोडणारी असून नागरिकांच्या आरोग्यासाठी ती अत्यंत चिंताजनक मानली जाते.

शहरात सध्या सर्दी, खोकला, घसा खवखवणे, श्वसनास त्रास होणे यासारख्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच श्वसनविकार असलेले रुग्ण यांच्यासाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. अनेक खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये श्वसनाशी संबंधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

चेंबूर, वडाळा, सायन, कुर्ला आणि घाटकोपरसारख्या औद्योगिक व गर्दीच्या भागांमध्ये प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे निरीक्षण आहे. काही ठिकाणी AQI 217 च्या वर गेल्याची नोंद झाली आहे. चेंबूर-वडाळा परिसरात अमोनियासारखे विषारी वायू हवेत मिसळत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. वाहनांची वाढती संख्या, मोठ्या प्रमाणावरील बांधकामे, रस्त्यांवरील धूळ आणि हवामानातील बदल ही या स्थितीमागची प्रमुख कारणे मानली जात आहेत.

दरम्यान, प्रदूषण नियंत्रणाच्या मुद्द्यावर न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वायू प्रदूषण नियंत्रणाच्या ढिसाळ अंमलबजावणीवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला फटकारले आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनाही न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.

महापालिकेच्या तपासणीत वांद्रे पूर्व येथील नव्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामस्थळी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात आलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले असून, यासंदर्भात याआधीच कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. तरीही सुधारणा न झाल्याने आता ‘स्टॉप वर्क’ नोटीस देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. संबंधित ठिकाणी त्रुटींचे फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग करून अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात हवा अधिकच घातक होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, मास्कचा वापर करावा आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

मुंबईसारख्या महानगरात स्वच्छ आणि सुरक्षित हवा ही केवळ सुविधा नसून नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली जाणे आता अत्यावश्यक ठरत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number