ST bus NCMC Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि पारदर्शकतेसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता एसटीच्या 30 हून अधिक सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे लालपरीचा प्रवास आता अधिक स्मार्ट आणि कॅशलेस होणार आहे.
डिजिटल युगाकडे एसटीचे मोठे पाऊल
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी 11 फेब्रुवारी 2026 रोजी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. सवलतींच्या वितरणात होणारी फसवणूक रोखणे आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पासाठी महामंडळाने M. Ebix Technologies Ltd. आणि NSDL Payments Bank यांच्याशी करार केला आहे. या कार्डमुळे प्रवाशांना सुट्ट्या पैशांची चिंता राहणार नाही आणि सवलतीची अचूक नोंद एका ‘टॅप’वर उपलब्ध होईल.
कोणाला आणि कसे मिळणार हे स्मार्ट कार्ड?
महामंडळाने समाजातील विविध घटकांसाठी या कार्ड देण्याची प्रक्रिया निश्चित केली आहे:
विद्यार्थी: शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘Saral’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड मिळेल.
ज्येष्ठ नागरिक आणि महिला: ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ आणि ‘महिला सन्मान’ योजनेच्या लाभार्थ्यांना Aadhaar कार्डशी संलग्न कार्ड दिले जाईल.
दिव्यांग: यांच्यासाठी UDID क्रमांकाशी जोडलेले विशेष कार्ड असेल.
पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक: अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि पुरस्कारार्थ्यांना विभागीय कार्यालयांमार्फत कार्डांचे वितरण केले जाईल.
कार्डची किंमत आणि रिचार्जचे गणित
प्रवाशांना हे कार्ड मिळवण्यासाठी खालील शुल्क भरावे लागेल:
नवीन कार्डची किंमत: 199 रुपये (GST सह).
जुने स्मार्ट कार्ड असल्यास: जुने कार्ड जमा करून केवळ 149 रुपयांत नवीन NCMC कार्ड मिळवता येईल.
वॉलेट मर्यादा: कार्डमध्ये किमान 100 रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे. रिचार्ज 50 रुपयांच्या पटीत करता येईल.
रिचार्ज सुविधा: बसमधील कंडक्टरच्या इटीआयएम (ETIM) मशीनवर, अधिकृत वेबसाइट, मोबाईल ॲप किंवा 3,000 हून अधिक नियुक्त एजंटांकडे रिचार्ज करता येईल.
? ११ फेब्रुवारी २०२६ | ? मंत्रालय एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या प्रवासात आता तंत्रज्ञानाचे नवे पाऊल टाकले आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल… pic.twitter.com/bcGrcJJ8fl — Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) February 11, 2026
नोंदणी प्रक्रिया आणि अंमलबजावणी
राज्यभरातील सर्व एसटी बसस्थानकांवर लवकरच विशेष नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकांवरच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. हे कार्ड केवळ एसटी प्रवासासाठीच नाही, तर मेट्रो, टोल आणि रिटेल पेमेंटसाठीही वापरता येणे शक्य आहे. त्यामुळे प्रवाशांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून हे स्मार्ट कार्ड मिळवावे, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.