मुंबई: अवघ्या काही आठवड्यातच दिवाळी सण राज्यासह देशभरात साजरा केला जाणार आहे. यासाठी अनेकण गावी जाणार आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, राज्य परिवहन महामंडळाने (एसटीने) दिवाळी हंगामात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी यंदा राज्यभरातून तब्बल 902 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, दिवाळीत प्रवासाचा ताण कमी होऊन प्रवाशांना आरामदायी सेवा मिळणार आहे.
एसटीचा दिवाळी हंगाम 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी अपेक्षित असल्याने अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, मागील नऊ महिन्यांत एसटीच्या ताफ्यात तब्बल 2 हजार 400 नव्या बसगाड्यांची भर पडली आहे. यात वातानुकूलित आणि साध्या 'लालपरी' गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे, प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विशेष फेऱ्यांचे ऑनलाईन आरक्षण एसटीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच अधिकृत एजंट्सकडून उपलब्ध असेल. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तिकीट खिडकीच्या वेळेत वाढ करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आले आहेत. याशिवाय, चार आणि सात दिवसांचे प्रवासी पास आरक्षण केंद्रावर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले गेले आहेत. विशेष वाहतुकीदरम्यान, कोणत्याही प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष मार्ग तपासनीसांची नियुक्ती केली जाणार आहे. या संदर्भातील आदेश वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद आंनी सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना दिले आहेत.
राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. यात मुंबईसाठी 240, पुण्यासाठी 292, नाशिकसाठी 142, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीसाठी प्रत्येकी 62, तसेच नागपूरसाठी 4 विशेष फेऱ्या सोडल्या जाणर आहेत.