सध्या राज्याची लालपरी बस आता आर्थिक सक्षमतेच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासन आता मोठे निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. याबद्दल प्रताप सरनाईकांनी माहिती दिली आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला 250 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बैठक पार पडली. यामध्ये परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी सरनाईकांनी स्पष्ट केले की, एसटीची पोहोच राज्यातील प्रत्येक गावखेड्यापर्यंत आहे.
यामध्ये महामंडळाची 251 आगारे, 610 बसस्थानके आणि सुमारे 12 हजार बसेसचा ताफा ही जाहिरातदारांसाठी मोठी बाजारपेठ आहे. या संसाधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी बसेसचा बाहेरील आणि आतील भाग जाहिरातींसाठी उपलब्ध केला जाईल. परिणामी बसस्थानक परिसर आणि इमारतींचा वापर महसूल वाढीसाठी होईल. नव्या निविदा प्रक्रियेद्वारे पारदर्शकपणे कंत्राट देण्यात आले आहे.
सध्या जाहिरातींतून वार्षिक 22 कोटी रुपये मिळतात. मात्र, नव्या निविदा प्रक्रियेमुळे या उत्पन्नात दुपटीहून अधिक वाढ होणार असून, वार्षिक सरासरी 50 कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळणे अपेक्षित आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.