बारामती : बारामतीतील अमृता हॉटेल या ठिकाणी नाष्टा करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना धक्कादायक अनुभव आला आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांनी डोसा ऑर्डर केला असता डोसा खातेवेळी चक्क त्यामध्ये मच्छर असल्याचे ग्राहकाच्या निदर्शनास आले. यावेळी हॉटेल मालकाला या डोसामध्ये मच्छर असल्याचे सांगितले असता त्यावर मालकाने पहिल्यांदा नकार दर्शवला. हा मच्छर वरून पडला असेल, असे उडवाउडवीचे उत्तर मालकाकडून देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्यांनी पाहिल्यानंतर त्या डोसाच्या आतमध्ये मच्छर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हॉटेल मालकाने चूक मान्य केली. चुकून आमच्या कर्मचाऱ्याकडून झाले असेल, माफ करा, अशी कबुली हॉटेल चालक प्रफुल्ल आहुजा यांनी केली. डोसामध्ये चक्क मच्छर आढळून आल्याने बारामतीतील हॉटेलवर नेमकी एफडीआयचे आयुक्त तुकाराम मुंढे नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अन्न सुरक्षा, स्वच्छता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबविली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात 11 ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि डेअरी आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच अन्न सुरक्षा व मानकांशी संबंधित नियमांचे पालन न केल्याचे आढळून आल्याने 16 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे सोमवारपासून शाळांच्या परिसरात हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट (एचएफएसएस) अर्थात जंक फूड पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध विशेष कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे.