राज्यात मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न तापला असतानाच, दुसरीकडे मुंबईतील ७२ टक्के मशिदींचे पहाटेचे भोंगे बंद असल्याचे गोपनीयरीत्या घेतलेल्या आढाव्यातून स्पष्ट झाले आहे.
भोंग्याचा वापर न करताच पहाटेची अजान केली जात असल्याचे पोलिसांनी गोपनीयरीत्या घेतलेल्या आढाव्यात समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईतील ७२ टक्के मशिदींनी पहाटेच्या पहिल्या अजानच्या वेळी भोंग्याच्या आवाजाची डेसिबल पातळी कमी केली आहे, तसेच अनेक ठिकाणी मशिदींवरील भोंगे बंद करण्यात आले आहे.
मागील आठवड्यात मुंबईतील सर्व धर्मांचे धर्मगुरू, मौलाना यांची पोलिसांनी बैठक घेतली होती. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कोणती कारवाई केली जाते, याची माहिती पोलिसांनी सर्वांना दिली होती. यासंदर्भात पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये, ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने दिलेला आदेश उपस्थितांना अवगत करून देण्यात आला. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करत ध्वनिप्रदूषण केल्यास कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जातो, हे ही त्यांना पटवून सांगितले. तसेच कायदा मोडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी समज उपस्थितांना देण्यात आली.