Mirza Rafi Ahmed Baig: मराठी काव्यविश्वात शोककळा; कवी मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

मराठी हास्यकाव्याच्या क्षेत्रातील दिग्गज आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे अमरावती येथे निधन झाले.

Mirza Rafi Ahmed Baig: मराठी काव्यविश्वात शोककळा; कवी मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

अमरावती: महाराष्ट्राच्या काव्यक्षेत्रातील तेजस्वी आणि विनोदी सादरीकरणाने श्रोत्यांना खळखळून हसवणारा एक अद्वितीय आवाज आज कायमचा थांबला. ‘मिर्झा एक्सप्रेस’ म्हणून देशभर परिचित असलेले सुप्रसिद्ध कवी आणि हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता अमरावती येथे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या गंभीर समस्यांशी झुंज देत होते. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने राज्याच्या कविविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

या दुःखद प्रसंगावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्रद्धांजली वाहत म्हटले “सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि ‘मिर्झा एक्स्प्रेस’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने आपण एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व गमावले आहे. 20 हून अधिक काव्यसंग्रह, 6000 पेक्षा जास्त काव्यमैफिली आणि विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”

हेही वाचा: India-Afghanistan Trade : पाकिस्तानसाठी मोठा धक्का?; भारत-अफगाणिस्तानमध्ये 100 दशलक्ष डॉलर्सचा करार

डॉ. मिर्झांच्या कवितांचे जग वेगळेच होते. मातीचा सुगंध, शेतकऱ्यांचे दैनंदिन वास्तव, ग्रामीण भागातील जीवनाचे हास्यरसातले चित्रण आणि राजकीय विसंगतीवर हलक्या फुलक्या विनोदांची जोड. त्यांच्या विनोदी शैलीने हजारो रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवले. वऱ्हाडी भाषेला त्यांनी दिलेला राष्ट्रीय स्तरावरील मान त्यांच्या आयुष्याची मोठी देणगी ठरली. अनेकांच्या मनात कायम घर करून राहिलेली गोष्ट म्हणजे ‘जांगळबुत्ता’ या शब्दाचे मूळही त्यांच्या लेखणीतच आहे. मोठा माणूस, सातवा महिना, उठ आता गणपत अशा त्यांच्या कविता दशके उलटूनही आजही तितक्याच लोकप्रिय आहेत.

त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात विनोदासोबत समाजातील चटका लावणाऱ्या वास्तवाची जाणीवही असायची. फक्त लेखन नव्हे, तर मंचही त्यांच्यासाठी उजाडलेला सूर्य होता. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली आणि 1970 पासून काव्यवाचनाची कारकीर्द सुरू झाली. पुढील 50 वर्षे ते विदर्भ मराठवाड्यातील प्रत्येक कविसंमेलनाचे तेज बनून राहिले. त्यांची उपस्थिती म्हणजे हशा, प्रकाश आणि अविरत उत्साह. कविसंमेलनांच्या परंपरेत त्यांचे योगदान इतके महत्त्वाचे होते की या परिसरातील कवी संमेलनांसाठी ते वर्षानुवर्षे केंद्रबिंदू बनले. नव्या कवींना प्रोत्साहन देणे, व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विनोदातून समाजभान जागवणे ही त्यांची शैली सर्वांनाच भुरळ घालत असे.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच साहित्यविश्वात शोककळा पसरली. ज्यांनी आयुष्यभर इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले, ते आज केवळ आठवणींच्या स्वरूपात उरले आहेत. हास्यकाव्याच्या प्रवासातील एक उज्ज्वल अध्याय बंद झाला असला तरी त्यांच्या लेखणीतून जन्मलेले शब्द आणि त्यांनी पेटवलेला हास्याचा दीप कायम उजळत राहील.

हेही वाचा: Kiara Advani – Siddharth Malhotra : कियारा- सिद्धार्थनं जाहीर केलं लेकीचं नाव; नावाचा अर्थही आहे खास

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number