उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मुंबई महापालिकेत साडेबारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असं कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे आजच एकनाथ शिंदेंनी यावर ‘एसआयटी’ स्थापन केली आहे. या ‘एसआयटी’च्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत नेलाय, त्यातील प्रत्येक पैसा परत आणण्याचं काम आमचं सरकार निश्चितपणे करेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिला होता. मात्र त्यांच्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटात खळबळ उडाली असून, आज माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेना भवन येथे दुपारी बारा वाजता होणाऱ्या या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. ते या बैठकीत काय बोलणार याकडे लक्ष लागले आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटातील अनेक खासदार, आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या आमदार मनिषा कायंदे यांनीही अनपेक्षितपणे शिवसेनेत प्रवेश केला. येणाऱ्या काही महिन्यात महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त होत आहे.
निवडणुका जवळ येतील, तसे अनेकजण ठाकरे गटाची साथ सोडण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. या निवडणुका आणि पक्ष सोडण्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे माजी नगरसेवकांना सूचना करण्याची शक्यता आहे. दरम्यान काही नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षातून होणारी गळती रोखण्यासाठी ठाकरे कोणता सल्ला देणार, याकडे आता लक्ष लागले आहे. आगामी पालिकेच्या निवडणुकीची काय रणनीती असणार, यावर ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोविड घोटाळ्याबाबत ठाकरेंना इशारा दिला आहे. त्या दृष्टीनेही या बैठकीकडे पाहिले जात आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे या बैठकीत या कथीत घोटाळ्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.