मनाली: बर्फाच्छादित पर्वत, पांढऱ्या शुभ्र दऱ्या आणि बर्फाचे गोळे एकमेकांवर फेकत खेळण्याचं स्वप्न अनेकांच्या मनात असतं. त्यामुळेच हिवाळा सुरू होताच कुल्लू–मनाली, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरकडे पर्यटकांचा ओघ वाढतो. सोशल मीडियावरील रील्स आणि व्हिडीओ पाहून प्रत्यक्ष बर्फाच्या डोंगरात भटकण्याचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. मात्र सध्या मनालीला गेलेल्या काही पर्यटकांचा हा स्वप्नरंजनाचा फुगा फुटल्याचं चित्र समोर आलं आहे. मनालीत ‘बर्फ स्कॅम’ झाल्याचा आरोप करत अनेक पर्यटकांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केले आहेत.
टूर कंपन्यांनी भरपूर बर्फ, स्कीईंग आणि बर्फाच्छादित निसर्ग दाखवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात पर्यटकांना जे दाखवण्यात आलं, ते पाहून अनेक जण हैराण झाले. “यापेक्षा जास्त बर्फ तर घरच्या फ्रीजमध्ये पाहायला मिळतो,” अशा उपरोधिक प्रतिक्रिया पर्यटक देत आहेत. हा प्रकार उघडकीस आणणारे व्हिडीओ पंकज नावाच्या एका व्यक्तीने इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला असून असेच अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये एका छोट्याशा मैदानात थोडासा बर्फ टाकून त्याभोवती गर्दी जमवलेली दिसते. हा बर्फ नैसर्गिक नसून ट्रकमधून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे. कॅमेरा सुरू झाल्यावर पर्यटकांना स्कीईंग करत असल्याचं नाटक करायला लावलं जात असल्याचंही काही व्हिडीओंमध्ये दिसून येतं.
बर्फाचे डोंगर, गोठलेल्या नद्या आणि नैसर्गिक हिमवृष्टी पाहण्याच्या अपेक्षेने मनालीला गेलेले पर्यटक प्रत्यक्षात फसवणुकीचा अनुभव घेत असल्याचं सांगत आहेत. काही जणांनी थेट “आमच्यासोबत स्कॅम झाला” असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे पर्यटनाच्या नावाखाली पर्यटकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे.
तज्ज्ञांच्या मते, हिमाचल प्रदेशात बर्फ पडतो, मात्र लडाखसारखा वर्षभर बर्फ तिथे आढळत नाही. मनाली परिसरात डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारी महिन्यात बर्फ पाहण्याची शक्यता जास्त असते, तर फेब्रुवारीपर्यंत काही भागांत हिमवृष्टी टिकून राहते. त्यामुळे कोणत्याही टूर कंपनीच्या गोड आश्वासनांवर डोळेझाकून विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं.
पर्यटनाची योजना करताना योग्य माहिती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. टूर बुक करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज, स्थानिक परिस्थिती, सोशल मीडियावरील रिव्ह्यू आणि अनुभव वाचणं आवश्यक आहे. अन्यथा बर्फाच्या स्वप्नामागे धावणं फसवणुकीत बदलू शकतं. हा प्रकार पर्यटकांसाठी इशारा ठरत असून, सजग राहिल्यासच अशा स्कॅमपासून बचाव करता येईल.