Maharashtra Weather: महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट! पुढील 5 दिवस मुसळधार सरींचा अंदाज; या’ जिल्ह्यांना इशारा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू असतानाच हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे

Maharashtra Weather: महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट! पुढील 5 दिवस मुसळधार सरींचा अंदाज; या’ जिल्ह्यांना इशारा

महाराष्ट्र: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू असतानाच हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांसाठी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात २ आणि ३ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Abhijeet Dipke On Sonam Wangchuk : "अविश्वास कुठे दाखवला" वांगचुक यांच्या मोठ्या विधानानंतर दीपकेंची रोखठोक प्रतिक्रिया

मराठवाड्यात वादळी हवामानाची शक्यता

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने उघड्या मैदानात किंवा झाडाखाली थांबणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवावे.

उर्वरित महाराष्ट्रात कसे राहणार हवामान?

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसह इतर अनेक भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात. मुसळधार पावसाचा धोका सर्वत्र नसला तरी वातावरणात आर्द्रता वाढल्याने अधूनमधून पावसाच्या सरी अनुभवायला मिळू शकतात.

हेही वाचा: Maratha Protest : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस; राज्य सरकारचे चार शिलेदार भेटीसाठी येण्याची शक्यता, तोडगा निघणार?

हवामानात बदलाचे कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय राहणे आणि अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. या प्रणालींच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

पावसासोबत विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना विशेष काळजी घ्यावी. विजा चमकत असताना मोकळ्या शेतात थांबणे टाळावे. तसेच पिकांमध्ये पाणी साचू नये यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. राज्यातील हवामानात पुढील काही दिवस चढ-उतार कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number