Maharashtra Weather: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! या 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट, IMD चा मोठा अंदाज

महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra Weather: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा! या 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट, IMD चा मोठा अंदाज

महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसानंतर आता हवामानात काहीसा बदल दिसून येत आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरस्थितीचा परिणाम अद्याप कायम आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील 19 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरींसह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अलीकडेच खानदेशातील काही भागांत मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले होते. जळगाव, धुळे आणि परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. काही भागांत घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. अनेक गावांचा संपर्कही काही काळ तुटला होता. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार आहे.

हवामान विभागाने ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक घाट परिसर तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने डोंगराळ भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

2 ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा घाट, कोल्हापूर घाट तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट लागू राहणार आहे. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर आणि विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहील.

4 आणि 5 ऑगस्टदरम्यान राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र विदर्भातील भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाच्या सरी सुरू राहू शकतात.

हवामान विभागाने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number