महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. प्रवाशांशी संवाद साधताना अडचणी येऊ नयेत आणि चालकांना स्थानिक भाषेत आवश्यक माहिती देता यावी, यासाठी चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी तपासण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम सुरू झाली आहे. तपासणीमध्ये एखाद्या चालकाला दैनंदिन व्यवहारापुरती मराठी समजत किंवा बोलता येत नसल्याचे आढळल्यास त्याला तातडीने कारवाईला सामोरे जावे लागणार नाही. संबंधित चालकाला नोटीस देऊन मराठी भाषा शिकण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे.
मात्र, या मुदतीत आवश्यक मराठीचे ज्ञान प्राप्त केले नाही, तर चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक क्षेत्रातील चालकांना या नियमाचे गांभीर्य लक्षात घेऊन मराठीचे आवश्यक ज्ञान आत्मसात करावे लागणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेशात तपासणी मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात 3,995 चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 604 चालकांना व्यावहारिक मराठीचे अपेक्षित ज्ञान नसल्याचे आढळले. या चालकांना नियमांची पूर्तता करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. मुंबईबाहेरील राज्यातील विविध भागांमध्येही तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 4,222 चालकांची तपासणी करण्यात आली असून 664 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत 8,217 चालकांची तपासणी झाली असून 1,268 चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही तपासणी मोहीम 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.प्रवाशांशी संवाद, मार्गाची माहिती, वाहतूक नियम आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक संवाद या बाबी लक्षात घेऊन चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणे महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.