मुंबई : प्रादेशिक संपर्क व्यवस्था सुधारणे आणि वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने मीरा-भाईंदरला वसई-विरारशी जोडणाऱ्या ‘मेट्रो मार्ग 13’ प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. 25.03 किमी लांबीचा हा मेट्रो 13 मार्ग ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’द्वारे (MMRDA) कार्यान्वित केला जाईल. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 17,724.99 कोटी रुपये इतका आहे. या मार्गावर एकूण 16 स्थानके असतील. ज्यामध्ये 13 स्थानके उन्नत (elevated) आणि तीन भूमिगत असतील. तसेच 21.78 किमीचा मार्ग उन्नत आणि 3.25 किमीचा मार्ग भूमिगत असेल.
हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार यांना जोडेल. तसेच नायगाव, नालासोपारा आणि विरार येथील उपनगरीय रेल्वे स्थानकांशी जोडला जाईल. नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे मेट्रो मार्ग 9 शी जोडणी करण्याचा प्रस्तावही आहे. या प्रकल्पामध्ये वसई खाडीवर पंजू बेटाला जोडणारा 4.92 किमी लांबीचा सहा पदरी रस्ता व मेट्रोचा संयुक्त पूल, तसेच चिखल डोंगरी येथे मेट्रो डेपोचा समावेश आहे. सर्व स्थानकांवर बस सेवा उपलब्ध करून दिली जाईल. फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना पुढील सहा महिन्यांत भूसंपादन आणि संपर्क रस्ते (अप्रोच रोड्स) पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या प्रकल्पाचे काम मंजुरी मिळाल्यापासून पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, 2031 पर्यंत दररोज सुमारे 4.49 लाख प्रवासी या कॉरिडॉरचा वापर करतील, असा अंदाज आहे.
सरकारच्या मते, या कॉरिडॉरमुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासाचा वेळ जवळपास 50 टक्क्यांनी कमी होईल. तसेच खासगी वाहनांवरील अवलंबित्व आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन कार्बन उत्सर्जनही घटेल. याशिवाय, वसई-विरार, मीरा-भाईंदर, मुंबईची उपनगरे आणि औद्योगिक व लॉजिस्टिक्स केंद्रे यांच्यातील संपर्क व्यवस्थाही यामुळे अधिक सुधारणार आहे. पायाभूत सुविधा समितीने पुणे रिंग रोडच्या पूर्व दिशेकडील विस्तारासाठी 10,502.36 कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्प खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे केली जाईल.
या विस्तारामध्ये पुणे-सोलापूर मार्गावरील सोरतपावाडी (वाल्टी) ते पुणे-सातारा मार्गावरील वरवे (बु.) – शिवरे या दरम्यानच्या 31.805 किमी लांबीच्या ‘ॲक्सेस-कंट्रोल्ड’ (प्रवेश-नियंत्रित) द्रुतगती मार्गाचा समावेश असेल. पुणे शहरातून जाणारी आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत वाहतूक शहराबाहेरून वळवणे आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, हा यामागचा उद्देश आहे. संपूर्ण रिंग रोड प्रकल्प 168.981 किमी लांबीचा असून, या प्रकल्पाची सलगता सुनिश्चित झाल्यानंतर त्याचा एकात्मिक ‘ॲक्सेस-कंट्रोल्ड’ मार्ग पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी सुमारे 80 टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून जून 2029 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.