कोल्हापूरकरांच आणि माधुरी हत्तीणीच गेल्या अनेक वर्षांपासून जपलेलं एक भावनिक नातं आहे. नांदणीच्या मठात वाढलेली माधुरी गुजरातमधील वनतारामध्ये गेल्यानंतर तिच्या परतीची मागणी सातत्याने होत होती. अशातच कोल्हापूरच्या शिरोळमध्ये असलेल्या नांदणी मठात माधुरी हत्ती अखेर 13 महिन्यांनी पुन्हा परतली आहे. माधुरी शुक्रवारी रात्री नांदनीत दाखल झाली. गुजरात ते कोल्हापूर असा 48 तासांपासून तिचा प्रवास सुरू होता.
नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची बहुचर्चित माधुरी हत्तीण मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून गावात पोहोचली आणि ‘माधुरी’प्रेमींकडून जल्लोष साजरा करताना अनेकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. माधुरी हत्तीच्या स्वागतासाठी रांगोळी देखील काढण्यात आली होती. यावेळी कोल्हापूरकरांनी अनंत अंबानी यांच बॅनर लावून आभार मानले.
उच्चस्तरीय समितीच्या मंजुरीनंतर ‘माधुरी’ला नांदणी मठात परतण्यास परवानगी मिळाली होती. त्यानुसार माधुरीला नांदणी मठात आणण्यात आले. माधुरीकडून कोणतेही काम करून घेतले जाणार नाही. 24 तास देखभाल आणि दर 15 दिवसांनी आरोग्य तपासणीची अट घातली आहे. नांदणी मठात परतल्यानंतरही माधुरीच्या आरोग्य तपासणी व उपचारांसाठी वनताराचे पशुवैद्यक विभाग सहकार्य करणार आहेत.
कोल्हापुरात दाखल होताच कोल्हापूर करांनी गुलाल उधळून तिचं स्वागत केलं. तर संध्याकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. अनेक ठिकाणी वनतारा सेंटरचे संस्थापक अनंत अंबानी यांचे आभार माणणारे पोस्टरही झळकले. एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे वाहनांच्या ताफ्यातून आणि प्रचंड पोलिस बंदोबस्तात माधुरीची तब्बल चारशे दिवसांनंतर नांदणी गावात दिमाखदार स्वागताने घरवापसी झाली.