Chandra Grahan 2026 Time : यावर्षीच्या पहिल्या चंद्रग्रहणाचे वेध संपूर्ण भारताला लागले आहेत. 3 मार्च 2026 रोजी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हे ग्रहण लागणार असून, ते भारतातून स्पष्टपणे पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, हे 'ग्रस्तोदय चंद्रग्रहण' असल्याने धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टीकोनातून याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. या ग्रहणाचा कालावधी, सूतक काळ आणि कोणत्या राशीत आणि नक्षत्रात हे ग्रहण लागणार आहे, जाणून घेऊ. याचा कोणत्या राशींवर विशेष परिणाम होऊ शकतो, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
कोणत्या राशीत आणि नक्षत्रात लागणार ग्रहण?
ज्योतिष शास्त्रानुसार, हे चंद्रग्रहण 'सिंह' राशीत आणि 'पूर्वा फाल्गुनी' नक्षत्रात लागणार आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, तर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रहणाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडणार असला, तरी सिंह आणि तूळ राशीसाठी हे ग्रहण महत्त्वाचे बदल घडवून आणू शकते.
काय आहे 'ग्रस्तोदय' चंद्रग्रहण?
भारतात हे चंद्रग्रहण 'ग्रस्तोदय' स्वरूपात दिसणार आहे. 'ग्रस्तोदय' याचा अर्थ असा की, जेव्हा भारतात चंद्रोदय होईल, तेव्हा चंद्र आधीच ग्रहणाच्या स्थितीत असेल. म्हणजेच, ग्रहण लागलेल्या अवस्थेतच चंद्राचे आगमन होणार असल्याने याला 'ग्रस्तोदय चंद्रग्रहण' म्हटले जाते. यामुळेच भारतात या ग्रहणाचा प्रारंभ आणि खग्रास स्थिती पाहता येणार नाही; तर चंद्रोदयापासूनच ग्रहणाची सुरुवात मानली जाईल.
ग्रहणाची वेळ आणि कालावधी
हे या वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण असणार आहे. जागतिक स्तरावर हे ग्रहण दुपारी 03:20 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 06:47 वाजता समाप्त होईल. ग्रहणाचा एकूण कालावधी 03 तास 27 मिनिटे इतका असेल. मात्र, भारतात चंद्रोदयाची वेळ सरासरी संध्याकाळी 06:22 वाजता आहे (वेगवेगळ्या शहरांनुसार यात काही मिनिटांचा फरक असू शकतो). त्यामुळे भारतात हे ग्रहण केवळ शेवटची 25 मिनिटे पाहता येईल.
सूतक काळ आणि धार्मिक नियम
धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. भारतीय वेळेनुसार, 3 मार्च 2026 रोजी सकाळी 06:20 वाजल्यापासून सूतक काळ सुरू होईल. सूतक काळामध्ये देवपूजा, भोजन आणि शुभ कार्ये वर्ज्य मानली जातात. ग्रहण संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 06:47 नंतर स्नान आणि शुद्धीकरण करून सूतक काळ समाप्त होईल.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.