अजय घोडके, प्रतिनिधी
लातूर: लातूर शहरातील ‘ग्रीन बेल्ट’साठी राखीव असलेल्या जागेवर ग्रंथालय सुरू असल्याचे भासवून ‘क्रेडाई’ संघटनेचे कार्यालय थाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशातील खाजगी रिअल इस्टेट क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘क्रेडाई’च्या लातूरमधील पदाधिकाऱ्यांकडूनच नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते सुरज साळुंके यांनी केला आहे.
लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील गट क्र. 7/1 येथील मंजूर लेआउटमधील जागा ग्रीन बेल्ट व ग्रंथालयासाठी राखीव असल्याचे सांगण्यात येत असून त्या जागेचा वापर ‘क्रेडाई’च्या कार्यालयासाठी केला जात असल्याचे राज्य शासनाला दिलेल्या लेखी तक्रारीत सांगण्यात आले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील नियमावली, बांधकामविषयक धोरणे आणि गृहनिर्माण क्षेत्रातील पारदर्शकता याबाबत काम करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीच नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्याने या प्रकरणाची लातुरात चर्चा सुरू झाली आहे. शिवाय 'ग्रीन बेल्ट' साठी राखीव असलेल्या जागेचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला, त्यासाठी लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाची परवानगी घेण्यात आली का? आणि मंजूर आराखड्यानुसार त्या जागेचा वापर होत आहे की नाही? याची सखोल चौकशी करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे. ‘ग्रीन बेल्ट’साठी राखीव जागा ही नागरिकांच्या हितासाठी खुली असणे आवश्यक असून, अशा जागेचा अन्य कारणांसाठी वापर होत असल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शहरातील पर्यावरणीय संतुलन आणि नागरिकांसाठी उपलब्ध सार्वजनिक जागा लक्षात घेता, संबंधित जागा तात्काळ नागरिकांसाठी खुली करावी. तसेच जागेचा वापर बदलण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने प्रयत्न झाले असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सूरज साळुंके यांनी केली आहे.
या आरोपांबाबत ‘क्रेडाई’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नसून, त्यांची अधिकृत बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.या गंभीर प्रकाराची राज्य शासन व लातूर महापालिका प्रशासनाकडून चौकशी केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.