लाडकी बहीण योजनेचे पैसे गेल्या काही महिन्यांपासून खात्यात जमा न झाल्यामुळे हिंगोलीमध्ये महिलांचा संताप उफाळून आला. मोठ्या संख्येने महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या आणि अधिकाऱ्यांना जाब विचारत जोरदार आंदोलन केले. काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.योजनेसाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनुदान जमा झाले नसल्याचा आरोप महिलांनी केला. गेल्या तीन महिन्यांचे मिळून 4500 रुपये खात्यात आले नसल्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी आहे. “सर्व कागदपत्रे वेळेत जमा केली, ई-केवायसीही पूर्ण केली, तरी पैसे का थांबवले?” असा सवाल आंदोलक महिलांनी प्रशासनाला केला.
सकाळपासूनच महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी केली होती. काही महिलांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत योजना बंद करण्यामागचं कारण स्पष्ट करण्याची मागणी केली. अनेक महिला संतप्त अवस्थेत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिसून आल्या. अचानक मोठ्या संख्येने महिला कार्यालयात आल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली.या आंदोलनानंतर हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी महिलांशी चर्चा केली. संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच पैसे का थांबले याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, जोपर्यंत अनुदान खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका काही महिलांनी घेतली होती. महिलांनी जवळपास दोन तास जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्या परतल्या. मात्र, या घटनेमुळे लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यभरातील अनेक महिलांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याचेही समोर येत आहे.