मुंबई: कुर्ला येथील कुरैशी नगर परिसरात घरावर क्रेन कोसळण्याच्या दुर्घटनेची MMRDAने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर तब्बल 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच दुर्घटनेत नुकसान झालेल्या घरांची आणि वाहनांची भरपाई करण्याचे निर्देशही कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.
शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुर्ला परिसरात ही धक्कादायक घटना घडली. कुर्ला आणि ट्रॉम्बे परिसरादरम्यान MMRDAकडून बांधकामाचे काम सुरू होते. या कामासाठी क्रेनच्या मदतीने जेसीबी मशीन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत होते.
दरम्यान, जेसीबीचे वजन क्रेनला पेलवले नाही आणि अचानक क्रेनचा तोल गेला. काही क्षणांतच क्रेन जवळच्या घरावर कोसळली. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी घबराट निर्माण झाली. क्रेनचा काही भाग रेल्वे ट्रॅकच्या दिशेनेही गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवत परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत काही नागरिक जखमी झाल्याची माहिती असून घर आणि वाहनांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे टोटल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली ही संबंधित कंत्राटदार कंपनी असल्याची माहिती समोर आली आहे.