Kolhapur Rain update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ! 54 बंधारे आणि 18 रस्ते पाण्याखाली; 250 हून अधिक गावांचा संपर्क तुटला

अनेक ठिकाणी रस्त्यांवर पूर ओसरला नसल्याने प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही सर्व वाहतूक तातडीने पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे.
Kolhapur Rain update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ! 54 बंधारे आणि 18 रस्ते पाण्याखाली; 250 हून अधिक गावांचा संपर्क तुटला

Kolhapur Rain update : गेल्या 5 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच प्रमुख नद्यांना पूर आला आहे. नद्यांची पाणीपातळी सातत्याने वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील एकूण 299 बंधाऱ्यांपैकी 54 बंधारे सोमवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. या बंधाऱ्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 250 हून अधिक गावांचे दळणवळण विसकळीत झाले आहे. याचा थेट फटका दूध वाहतूक, स्थानिक व्यापार, शाळा, व्यावसायिक आणि शेतीकामासाठी दैनंदिन ये-जा करणाऱ्या ग्रामीण नागरिकांना बसत आहे. गावांची थेट कनेक्टिव्हिटी तुटल्यामुळे वाहनधारकांना मोठा फेरा मारून पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागत आहे.

18 प्रमुख मार्ग बाधित; वाहतूक पर्यायी मार्गांकडे वळवली
मुसळधार पावसामुळे केवळ बंधारेच नव्हे, तर जिल्ह्यातील 18 प्रमुख वाहतूक मार्गही बाधित झाले आहेत. यामध्ये 3 राज्य महामार्ग, 5 प्रमुख जिल्हा मार्ग, 8 ग्रामीण मार्ग आणि 2 इतर जिल्हा मार्गांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पूर ओसरला नसल्याने प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही सर्व वाहतूक तातडीने पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचे धाडस करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – Krishna River Water Level: संततधार पावसादरम्यान नृसिंहवाडीत भक्तीमय वातावरण; 'दक्षिणद्वार सोहळ्याची' भाविकांमध्ये उत्सुकता

13 नद्यांवरील बंधाऱ्यांवर पुराचे पाणी
जिल्ह्यातील एकूण 15 प्रमुख नद्यांपैकी 13 नद्यांवरील बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक 10 बंधारे एकट्या वेदगंगा नदीवरील असून कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, सुरुपली, गारगोटी, म्हसवे, करडवाडी व शेणगाव या बंधाऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्याखालोखाल पंचगंगा नदीवरील 7 (शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ) आणि कासारी नदीवरील 7 (यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण, बाजार भोगाव, वालोली, कांटे व पेंडाखळे) बंधारे बुडाले आहेत. घटप्रभा नदीवरील 5 बंधाऱ्यांवर तर भोगावती, कुंभी आणि दूधगंगा नद्यांवरील प्रत्येकी 4 बंधाऱ्यांवर पाणी आले आहे.

इतर नद्यांची सद्यस्थिती आणि पाणीपातळी
याशिवाय जिल्ह्यातील इतर लहान-मोठ्या नद्यांनाही पुराचा वेढा पडला आहे. कडवी नदीवरील 3 (कोपार्डे, सवते सावर्डे व सरूड पाटणे) आणि वारणा नदीवरील 3 (कोडोली, मांगले सावर्डे व खोची) बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तुळशी नदीवरील कसबा बीड व आरे, ताम्रपर्णीवरील चंदगड व कोतेवाडी तसेच हिरण्यकेशी नदीवरील साळगाव व ऐनापूर असे प्रत्येकी 2 बंधारे जलमय झाले आहेत. धामणी नदीवरील सुळे येथील 1 बंधारा मिळून जिल्ह्यात एकूण 54 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरपरिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! कोकण, पुणे, नाशिकसह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट; सुरक्षेसाठी अनेक ठिकाणी शाळा-कॉलेजेस बंद

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version