Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरल्यानंतरही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ; राधानगरी धरण 80 टक्के भरले

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच असल्याने जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.
Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरल्यानंतरही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ; राधानगरी धरण 80 टक्के भरले

Kolhapur Radhanagari Dam Water Level : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानंतर आज पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. जरी धरणक्षेत्रात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली, तरी धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच असल्याने जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख मानले जाणारे राधानगरी धरण सध्या सरासरी 80 टक्के  भरले असून, त्यामानाने दूधगंगा धरणातील साठा संथ गतीने वाढत 43.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, पंचगंगा नदीची पाणीपातळी गेल्या 24 तासांत झपाट्याने वाढली आहे. सकाळी 8:00 वाजता पंचगंगेची पातळी 28 फूट 8 इंचांवर होती, याच्या आदल्या दिवशी सायंकाळी 7:00 वाजता 27 फूट 8 इंच इतकी नोंदवण्यात आली. नदीची पातळी वाढल्याने जिल्ह्यातील तब्बल 21 बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत.

तालुकानिहाय पाऊस आणि शेतीची कामे
गेल्या 24 तासांत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 7.5 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, हातकणंगले येथे 1.7 मिमी, शिरोळ येथे 1.8 मिमी, पन्हाळा येथे 10.6 मिमी, शाहूवाडी येथे 14.9 मिमी, राधानगरी येथे 26.5 मिमी, गगनबावडा येथे 20 मिमी, करवीर येथे 1.6 मिमी, कागल येथे 3.9 मिमी, गडहिंग्लज येथे 5 मिमी, भुदरगड येथे 7.5 मिमी, आजरा येथे 8.3 मिमी आणि चंदगड तालुक्यात 5.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या या आगमनामुळे शेतशिवारात पाणी साचले असून बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात सध्या भात रोपलावणीच्या कामांनी मोठा वेग घेतला आहे.

हेही वाचा – Weather Update : मुंबईसह 10 जिल्ह्यांना पुढील काही तास महत्त्वाचे! पुण्याला रेड अलर्ट, तर कोकणात 24 तासांत…

आजरा आणि राधानगरी भागात मुसळधार
आजरा तालुक्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून दिवसभर पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या. यामुळे हिरण्यकेशी आणि चित्रा नद्या पात्राबाहेर भरून वाहत असून परिसरातील ओढे आणि नाले तुडुंब भरले आहेत. हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा लवकरच पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, सर्फनाला प्रकल्पाच्या सांडव्यातून सध्या 380 क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे. आजरा, चित्री, चिकोत्रा, उचंगी आणि आंबेओहळ या सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.

केळोशी बुद्रुक प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्प संततधार पावसामुळे अखेर पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 5054 टीएमसी असून तो ओव्हरफ्लो झाल्याने जादा पाण्याचा विसर्ग उजव्या कालव्यातून थेट तुळशी जलाशयात सोडला जात आहे. यामुळे तुळशी धरणाच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ होत आहे. पावसाने काही ठिकाणी विश्रांती घेतली असली, तरी धरणांमधील वाढता जलसाठा जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे.

हेही वाचा – BEST Employee Strike: मागण्या मान्य न केल्यास लालपरीची चाकं थांबणार; 'या' तारखेपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version