कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील अनेक गावांचे जनजीवन विसकळीत झाले आहे. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांत पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे याआधीच खुले झाले आहेत. आता धरणातून प्रतिसेकंद 11,500 घनफूट पाण्याच विसर्ग सुरू आहे. यासह जिल्ह्यातील सर्वच धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
पंचगंगा नदीचे पाणी 36 फुटांवरून वाहत आहे. जिल्ह्यातील तब्बल 80 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक काहीशी विसकळीत झाली आहे. पर्यायी मार्गांचा वापर केला जात आहे. तर, काही ठिकाणी काही गावांशी संपर्कही तुटलेला आहे. घाट मार्गात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – Kolhapur Rain, Travel Update : कोल्हापूर जिल्ह्यातले हे मार्ग बंद; अनावश्यक प्रवास न करण्याचा सल्ला
गगनबावडा तालुक्यातले हे बंधारे पाण्याखाली
तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्याने कुंभी व सरस्वती नदीलापूर आला असून, वेतवडे, मांडुकली, शेणवडे व असळज येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर तिसंगी पैकी टेकवाडीचा थेट संपर्क तुटला आहे. यापूर्वीच कोदे, अणदूर व वेसरफ लघू प्रकल्प शंभर टक्के भरले असून, कुंभी प्रकल्प 96 टक्के भरला आहे.
कुंभी धरण
कुंभी धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. ''कुंभी'' प्रकल्पातून एकूण 1610 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कुंभी व सरस्वती नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कसबा तारळे
राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरु असल्याने भोगावती नदीला यावर्षी तिसऱ्यांदा पूर आला आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. दरम्यान, राधानगरीकडे जाणाऱ्या पडळी पाठोपाठ पिरळ येथील पुलावर पाणी आल्याने राधानगरीकडे होणारी वाहतूक कसबा तारळे, खिंडी व्हरवडे मार्गे वळविण्यात आली आहे. परिणामी वाहतुकीसह जनजीवन विसकळीत झाले आहे. नदी काठावरील शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली आहे.
दत्तवाड-एकसंबा, दत्तवाड-मलिकवाड बंधारे पाण्याखाली
नृसिंहवाडी / दत्तवाड : सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात होणारा पाऊस व धरणातून होणारे विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळी तब्बल नऊ फुटाने वाढ झाली असून नदीचे पाणी येथील दत्त मंदिरापर्यंत पोहोचले आहे.
दत्तवाड-एकसंबा व दत्तवाड-मलिकवाड हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यावर्षी पाचव्यांदा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसात कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे काळम्मावाडी धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रात पाणी वाढले असून बंधारे पाण्याखाली गेल्याने दत्तवाड-मलिकवाड व दत्तवाड-एकसंबा हे मार्ग बंद झाले आहेत.
गडहिंग्लजमधील दोन बंधारे पाण्याखाली
तालुक्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीवरील निलजी व ऐनापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव पूल पाण्याखाली जाऊन गडहिंग्लज-चंदगडचा थेट संपर्क तुटण्याची शक्यता आहे. आजरा व आंबोली परिसरात सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे हिरण्यकेशी पात्राबाहेर पडली असून, नदीकाठच्या गावांना व नागरिकांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
करवीर तालुक्यातील सात बंधारे पाण्याखाली
कोपार्डे : करवीर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम, शिंगणापूर, कोगे खडक, बहिरेश्वर-कोगे, सांगरूळ, आरे, वडणगे-चिखली हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने व राधानगरी धरणाचे सात दरवाजे यापूर्वीच उघडले आहेत. त्यामुळे करवीर तालुक्यातील चारही नदीपात्रांतील पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे.
हेही वाचा – जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे चांदोली धरण 90.02 टक्के भरलं! एकाच दिवसात पाणीसाठ्यात पाऊण टीएमसीने वा
महापालिकेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिंगणापूर बंधाऱ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे पाणीपातळी वाढताच नदीकाठच्या शेतात पाणी शिरून ऊस पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शिंगणापूर, चिखली, पाडळी बु।, नागदेववाडी, हणमंतवाडी गावांतील नदीकाठावरील शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.