Nitin Kadukar First Transgender PSI : श्री क्षेत्र बाळूमामा मंदिर परिसरात जोगवा मागून समाजसेवा करणाऱ्या पांडुरंग मारुती गुरव खरं तर 'देवमामा' या नावाने प्रसिद्ध असलेले.. एका सामान्य जोगत्याजवळ काय असणार.. पण त्यांनी तृतीयपंथी समुदायातील नितीन राजाराम कडूकर याला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याचे आयुष्य बदलले आहे.
चंदगड तालुक्यातील राजगोळी गावचे रहिवासी असलेल्या देवमामांनी स्वतः D.Ed पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते, परंतु वशिलेबाजीमुळे त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली नाही. पदरी निराशा आली तरी त्यांनी हार मानली नाही आणि देवदासी समुदायासोबत राहून जोगवा मागत समाजकार्य सुरू केले. याच प्रवासात त्यांनी नितीनला लहानाचे मोठे केले, त्याला पदवीधर केले आणि पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न दाखवून ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले.
150 पैकी 145 गुण मिळवत रोवला मानाचा तुरा
शासनाने पोलीस भरती प्रक्रियेत 'इतर' (Transgender) असा नवा रकाना समाविष्ट केल्याचा लाभ घेत नितीनने कोल्हापूरमधून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेत नितीनने 150 पैकी 145 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे नितीन कडूकर हा पुणे विभाग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथी 'पीएसआय' (PSI) ठरला आहे. लवकरच त्याचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार असून, या ऐतिहासिक यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतःही आयुष्यभर दुर्लक्षित समुदायात असताना आपल्यासारख्याच एका दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणून पोलीस अधिकारी पदापर्यंत पोहोचवल्याबद्दल देवमामांच्या मार्गदर्शनाचेही मोठे कौतुक केले जात आहे.
2021 पासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ट्रान्सजेंडरसाठी आरक्षणचा निर्णय झाला. पोलिस भरती अर्जात लिंग ओळखमध्ये पुरुष, स्त्री आणि इतर असा नवा कॉलम वाढवला. त्यामुळे परीक्षा दिली आणि 150/145 गुण मिळाले. – नितीन कडूकर (तृतीयपंथी)
मला शिक्षक व्हायचं होते. शिक्षण डी. एड. झालं. पण समुदायाची सेवा करण्याची संधी बाळूमामांनी दिली. इथं जोगवा मागून गुजराण करते. तर आलेल्या जोगव्यातून दानधर्म करते. हे पुण्याईचे काम आहे. समाजाला दिशा देण्यासाठी यापुढेही चांगलं काम करणार आहे. – पांडुरंग गुरव (देवमामा), आदमापूर
समाजानं विचार करण्याची वेळ!
आई-वडील मुलांसाठी किती झटतात, हे सांगायलाच नको. परंतु, एखाद्या आई-वडिलांचे मूल तृतीयपंथी असेल, तर त्यांना दुःख होतेच. पण ते ही बाब स्वीकारायला तयार नसतात. यामुळे अनेक आई-वडील त्या चिमुकल्या जीवाला त्याची ती परिस्थिती एकट्याने भोगण्यासाठी सोडून देतात आणि त्याच्याशी काहीही संबंध ठेवत नाहीत, ही बाब समाजात नवीन नाही. समाजही या मुलांना हेटाळणीच्या नजरेने पाहतो आणि दुर्लक्ष करतो. यामुळे बहुतेक वेळा या मुलांना त्यांच्या जीवनात योग्य मार्ग सापडत नाही आणि ती सर्व आयुष्य भरकटलेल्या स्थितीतच जगतात. मात्र, अशा एका चिमुकल्याला आपलंसं करून पोटच्या मुलाइतकंच प्रेमाने लहानाचं मोठं करणाऱ्या देवमामांनी समाजाला विचार करायला भाग पाडलं आहे. त्यांनी स्वतःच्या कृतीतून समाजाला एक चपराक ठेवून दिली आहे. आता नितीन कडूरकर ज्या समाजाने त्याला नाकारलं, त्याच समाजात मानाने पोलीस अधिकारी म्हणून वावरेल आणि याच समाजाची वर्दीच्या माध्यमातून सेवाही करेल. आता तरी माणसाचा माणूस म्हणून विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे या लोकांसोबतच समाजाचीही उन्नती होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.