खालापूर येथील श्री स्वामी समर्थ मठातून सुमारे 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या पादुका चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 160 ग्रॅम वजनाच्या या पादुका दोन संशयित चोरट्यांनी मठात प्रवेश करून लांबवल्या. चोरीची संपूर्ण घटना मठातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून मठात प्रवेश केला. त्यावेळी मठातील पुजारी तळमजल्यावर पूजेसाठी गेले होते. पुजारी मठाच्या दुसऱ्या भागात असल्याची संधी साधत संशयितांनी पादुका असलेल्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्या घेऊन तेथून पसार झाले.
पादुका चोरी केल्यानंतर दोन्ही संशयित चोरटे मठातून बाहेर पडून पनवेलच्या दिशेने निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. या फुटेजमध्ये चोरट्यांच्या हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसाठी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढणे महत्त्वाचे ठरणार आहे.घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही संशयितांचा शोध घेण्यात येत असून, त्यांच्या हालचाली आणि संभाव्य मार्गाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.