नवी मुंबईतील कामोठे परिसरात शाळेतून घरी परतणाऱ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीशी बसचालकाने कथित गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर कामोठे पोलिसांनी संबंधित चालकाविरोधात पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिका आपल्या कुटुंबासह कामोठे सेक्टर 18 येथे राहते. बुधवारी दुपारी ती सेक्टर 36 येथील शाळेतून शालेय बसने घरी परतत होती. याच प्रवासादरम्यान चालकाने तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घरी पोहोचल्यानंतर ही बाब पालकांच्या निदर्शनास आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी रात्री उशिरा कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.तक्रार मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित 30 वर्षीय चालकाविरोधात गुन्हा नोंदवला. आरोपी कळंबोली परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोक्सो कायद्यांतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.