Junnar crime: ‘बघा, मी CCTV मध्ये दिसतोय…’ आरोपीच्या एका वाक्याने पोलिसांना मिळाला मोठा क्लू; जुन्नर प्रकरणाचा थरारक उलगडा

जुन्नर तालुक्यात चिमुरडीच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला.

Junnar crime: ‘बघा, मी CCTV मध्ये दिसतोय…’ आरोपीच्या एका वाक्याने पोलिसांना मिळाला मोठा क्लू; जुन्नर प्रकरणाचा थरारक उलगडा

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी परिसरात चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपासादरम्यान त्याच्याच एका कृतीमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुरडीची प्रकृती बरी नसल्याने ती त्या दिवशी शाळेत गेली नव्हती. तिचे आई-वडील कामासाठी शेतात गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने मुलीशी जवळीक साधली. सायकल शिकवण्याच्या बहाण्याने त्याने तिला घरापासून काही अंतरावर नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

आई-वडील घरी परतल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध सुरू केला. काही वेळातच गावातील नागरिकही त्यांच्या मदतीला धावून आले. या शोधमोहीमेत आरोपीदेखील सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे. तो इतर गावकऱ्यांसोबत बसून मुलीचा शोध सुरू असल्याचे भासवत होता.

आरोपीच्याच बोलण्याने संशय बळावला

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. एका फुटेजमध्ये सायकलवरून जाणारी व्यक्ती दिसून आली. हे फुटेज पाहताना आरोपीने स्वतःहून त्या व्यक्तीकडे लक्ष वेधले आणि आपणही CCTV मध्ये दिसत असल्याचे सांगितले. त्याच्या या अनावश्यक बोलण्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.

यानंतर पोलिसांनी परिसरातील इतर CCTV कॅमेऱ्यांचीही तपासणी केली. दुसऱ्या एका कॅमेऱ्यात सायकलस्वार वेगाने एका दिशेने जाताना दिसला. चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी सायकल, व्यक्तीची शरीरयष्टी आणि हालचाली यांचा पोलिसांनी बारकाईने अभ्यास केला. दोन्ही फुटेजमधील साम्यामुळे तपासाची दिशा आरोपीकडे वळली.

पोलिसांच्या चौकशीत दाव्यांमध्ये विसंगती

संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. आपण शेतातील मळ्यात गेलो होतो, असा दावा त्याने केल्याची माहिती आहे. मात्र CCTV फुटेजमध्ये त्याच्या या दाव्याला पुष्टी मिळत नसल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक कसून चौकशी केली.

तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर त्याने पोलिसांना मृतदेह लपवलेल्या ठिकाणी नेले. गुऱ्हाळाजवळील शेत परिसरात एका पाईपखाली मृतदेह लपवण्यात आल्याचे तपासात आढळून आले.

या प्रकरणामुळे पिंपळवंडी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून, घटनेमागील संपूर्ण परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. CCTV फुटेज आणि आरोपीच्या हालचालींच्या आधारे पोलिसांनी तपास पुढे नेला आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number