जळगाव: जळगावच्या एमआयडीसी परिसरात एका व्यावसायिकाच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे ७ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या तणावाचा या घटनेशी संबंध असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ईश्वर कॉलनीतील ३५ वर्षीय योगेश एकनाथ नेमाडे यांचा एमआयडीसीतील एम-९१ सेक्टरमधील म्हाळसाई इरिगेशन कंपनीत मृत्यू झाला. सोमवारी ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी योगेश नेमाडे यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
भावासोबत चालवत होते व्यवसाय
योगेश नेमाडे हे त्यांचे भाऊ मयूर यांच्यासोबत व्यवसाय चालवत होते. व्यवसायाच्या निमित्ताने राजस्थानमधील राजोद येथील एका फर्मला माल पाठवण्यात आला होता. या व्यवहारातील सुमारे ७ लाख रुपयांची रक्कम अद्याप मिळाली नसल्याचा दावा समोर आला आहे. ही थकबाकी मिळण्यासाठी संबंधितांकडे वारंवार संपर्क साधण्यात आला होता. मात्र, अपेक्षित रक्कम मिळत नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
सुसाईट नोटमध्ये व्यवहाराचा उल्लेख
या प्रकरणात पोलिसांना एक सुसाईट नोट मिळाल्याची माहिती आहे. त्यामध्ये संबंधित फर्म, आर्थिक व्यवहार आणि थकीत रकमेबाबत माहिती नमूद असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात भावाला संदेश देण्यात आल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, संबंधित व्यावसायिकाच्या कॉल लिस्टची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे या आर्थिक व्यवहारामागील नेमकी परिस्थिती काय होती, संबंधित व्यक्तींमध्ये कोणता संवाद झाला आणि थकीत रक्कम का मिळाली नाही, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
गणपतीची मूर्ती आणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घटना
योगेश नेमाडे यांच्या कुटुंबासाठी ही घटना अत्यंत धक्कादायक ठरली आहे. गणपतीची मूर्ती घरी आणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. सुसाईट नोटमधील माहिती, आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींशी झालेला संपर्क यांची पडताळणी केल्यानंतरच या घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट होणार आहे.