गणेशोत्सव सण हा उत्साहाचा असला तरी काही अघटित घटनांनी या सणात व्यत्यय येते. आधी भुलेश्वर मग कुर्ला येथील गणेशमूर्त्यां कोसळल्याची बातमी ताजी असतानाच अजून एका घटनेची यात भर पडलेली आहे. ती म्हणजे जळगाव येथील बुऱ्हाणपूरहून 12 फुट उंचीची आणलेली गणेशमूर्ती वाहतुकीदरम्यान दुभंगली. संबंधित जय महाराष्ट्र मित्र मंडळाने मूर्तिकारावर आरोप टाकला आहे, कारण मूर्ती पूर्णपणे वाळण्यापूर्वीच ती घाईघाईत मंडळाच्या ताब्यात देण्यात आली
जय महाराष्ट्र मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी बऱ्हाणपूर येथील मूर्तिकाराकडून तब्बल 12 फूट उंचीची गणेशमूर्ती बनवून घेतली होती. या मूर्तीसाठी मंडळाने सुमारे 47 हजार रुपये खर्च केले होते. मूर्ती जळगावला आणताना ती पूर्णपणे झाकून ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवासादरम्यान मूर्तीला तडा गेला किंवा ती दुभंगली असल्याचे त्यावेळी कार्यकर्त्यांच्या लक्षात आले नाही.
गुरुवारी सायंकाळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीवरील आवरण काढल्यानंतर मूर्ती दुभंगल्याचे समोर आले. गणेशोत्सवाच्या काही दिवसांपासूनच मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मूर्तीच्या स्थापनेसाठी जोरदार तयारी सुरू होती. मात्र, उत्सवाच्या तोंडावरच मूर्तीची अशी अवस्था झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीसोबतच हळहळही व्यक्त करण्यात आली. दुभंगलेली गणेशमूर्ती मंडपात स्थापन करणे शक्य नसल्याने शुक्रवारी मंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत तिचे मेहरुण तलावात विसर्जन करण्यात आले.
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गणेश मंडळ, कार्यकर्ते आणि मूर्तिकारानेही या घटनेची दखल घेणे आवश्यक आहे. मूर्तीची ने-आण करताना वाहतूक क्षमता, रस्त्यांची अवस्था, गतिरोधक व वीजवाहिन्या अशा इतर महत्त्वाच्या बाबींची सखोल तपासणी ही गणेश मंडळ व कार्यकर्त्यांनी करायला हवी.