Malanggad Funicular Train: दुर्गम आणि उभ्या चढणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्री मलंगगडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आता कमालीचा सोपा झाला आहे. देशातील सर्वात लांब पल्ल्याची 'फ्युनिक्युलर ट्रेन' सेवा अखेर गडावर सुरू झाली असून, रविवारी भाजप आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते याचे थाटात लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे, उद्घाटनानिमित्त पुढील दोन दिवस भाविकांना या ट्रेनमधून मोफत प्रवास करता येणार आहे.
दोन दशकांची प्रतीक्षा संपली
या प्रकल्पाचा प्रवास सोपा नव्हता. 2004 मध्ये आमदार किसन कथोरे यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर तब्बल 22 वर्षांनंतर मोहोर उमटली आहे. 2012 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊनही राजकीय सीमांकन आणि निधीच्या अभावामुळे हा प्रकल्प रखडला होता. अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारामुळे कामाला गती मिळाली आणि 2026 च्या मलंगगड यात्रेपूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे.
वेळेची मोठी बचत आणि सुविधा
मलंगगडावर हाजी मलंग बाबांच्या दर्शनासाठी भाविकांना तब्बल 2600 पायऱ्या चढाव्या लागत असत. यासाठी साधारणतः दोन तास लागायचे. मात्र, आता फ्युनिक्युलर ट्रेनमुळे हे दोन तासांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार करता येईल. दरम्यान, या ट्रेनमध्ये एका वेळी 120 प्रवासी प्रवास करू शकतात. 70 कर्मचाऱ्यांचे पथक या यंत्रणेच्या देखरेखीसाठी तैनात आहे. या ट्रेनमुळे वृद्ध, लहान मुले आणि शारीरिक व्याधी असलेल्या भाविकांना आता सहज गडावर पोहोचता येईल.
काय आहे ही फ्युनिक्युलर यंत्रणा?
ही एक विशेष 'केबल रेल्वे' प्रणाली असून जी ट्रेन आणि लिफ्ट यांचे मिश्रण वाटते. लॅटिन भाषेत याचा अर्थ 'लहान दोरी' असा होतो. गुरुत्वाकर्षण आणि मजबूत केबल्सचा वापर करून ही गाडी डोंगर उतारावर सुरक्षितपणे धावते. लोकार्पण सोहळ्याला या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गैरहजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमधील हा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.