भारतामधील इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांना होर्मुज सामुद्रधुनीजवळ दोन भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांवर झालेल्या गोळीबाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी अशा घटनेबाबत थेट माहिती नसल्याचे सांगितले. मात्र भारत आणि इराण यांच्यातील संबंध अत्यंत मजबूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोणतीही समस्या उद्भवल्यास ती संवादातून सोडवली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इलाही यांनी सांगितले की, भारत आणि इराण यांचे संबंध 5000 हजार वर्षांपासूनचे आहेत. दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक नाते खूप मजबूत आहे. त्यांनी इराण युद्ध नको तर शांतता हवी असल्याचेही म्हटले. तसेच भारताचे पंतप्रधान आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्यात झालेली चर्चा सकारात्मक ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जग अर्नव आणि सनमार हेराल्ड या दोन भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर होर्मुज सामुद्रधुनीत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ही दोन्ही जहाजे इराकमधून कच्चे तेल घेऊन भारताकडे येत होती. गोळीबारानंतर दोन्ही जहाजांना माघारी फिरावे लागले. सुदैवाने कोणत्याही खलाशाला दुखापत झाली नाही.
या घटनेनंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त करत भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी व्यापारी जहाजे आणि भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताची चिंता व्यक्त केली. तसेच भारताकडे येणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, व्यापारी जहाजांवर झालेला गोळीबार अत्यंत गंभीर बाब आहे. इराणने यापूर्वीही भारताकडे येणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला होता, याची आठवण करून देण्यात आली. यावर इराणी राजदूतांनी भारताची भूमिका तेहरानपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.