बुलढाणा : बुलढाण्यातून एक अत्यंत अद्भूत आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील 'चारबन' या आदिवासी बहुल गावात एका महिलेने एकाच वेळी तब्बल चार बाळांना जन्म दिला आहे. लाखो-करोडोंमध्ये एखादीच घडणारी ही अत्यंत दुर्मिळ घटना असून सध्या संपूर्ण परिसरात या चमत्काराचीच चर्चा सुरू आहे. चारबन येथील रहिवासी पंशिराम सस्त्या यांची 27 वर्षीय पत्नी रियानी यांनी कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय, अत्यंत कठीण परिस्थितीत घरच्या घरी चार बाळांना जन्म दिला. यामध्ये तीन मुलगे आणि एका मुलीचा समावेश आहे. प्रसूतीनंतर तात्काळ माता रियानी आणि चारही नवजात बालकांना जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली असता, सुदैवाने आई आणि चारही बाळे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा दुर्मिळ प्रसूतीमध्ये बाळं मुदतीपूर्व जन्माला येत असल्याने त्यांचे वजन कमी असते. या बालकांचे वजन 900 ग्रॅम ते 1 किलोदरम्यान असल्याने, त्यांना अधिक चांगल्या आणि विशेष वैद्यकीय उपचारासाठी तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या खामगाव येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली माता आणि तिच्या चारही चिमुकल्यांवर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सुविधा नसतानाही आई आणि चारही बालके सुखरूप राहिल्याने निसर्गाचा हा एक अनोखा चमत्कारच मानला जात आहे.