रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात स्त्री-पुरुष समानतेचा आणि पुरोगामी विचारांचा आदर्श घालून देणारी घटना समोर आली आहे. खेड महाडनाका येथील लक्ष्मीबाई तुकाराम पालांडे यांच्या निधनानंतर त्यांच्या पाचही मुलींनी आईच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वतः पार पाडली. चार मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला, तर मोठी कन्या ममता मंगेश भोसले यांनी मुखाग्नी देत अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले. ‘अंत्यसंस्कारासाठी मुलगाच हवा’ या पारंपरिक मानसिकतेला छेद देणाऱ्या या कृतीचे खेड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात कौतुक होत आहे. स्त्रिया कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत, असा संदेश या घटनेतून समाजासमोर आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आईच्या निधनानंतर तिच्या चार मुलींनी प्रेत यात्रेला खांदा दिला, तर मोठ्या शिक्षिका मुलीने आईला मुखाग्नी देऊन अंतिम संस्कार पार पाडले. मु. पो. खेड महाडनाका (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील रहिवासी गं. भा. लक्ष्मीबाई तुकाराम पालांडे यांचे 21 ऑगस्ट 2026 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिल्हा परिषद शाळा तिसे शिगवणवाडी (ता. खेड) येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या त्यांच्या मोठ्या कन्या ममता मंगेश भोसले (मुळगाव तिसंगी ता. खेड) आणि त्यांच्या चार बहिणी सुनयना सुधीर सावंत, ज्योती हरिष मोरे, सुजाता राहूल भोसले, निता विक्रम रेपाळे यांनी दुःखाच्या प्रसंगी खंबीर भूमिका घेतली. रूढींच्या चक्रात अडकून न पडता, आईच्या पार्थिवाला चारही बहिणींनी स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतले, तर ममता मंगेश भोसले यांनी आपल्या आईला मुखाग्नी दिला.