जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबलच्या सर्तकतेमुळे पाकीट मारी करणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. बुलडाणा पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे यांनी चक्क बस मध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या पिशव्यातून पैसे काढतानाचा व्हीडिओ काढून ह्या पाकीट मार महिलांच्या टोळीला अटक केली आहे.
बुलडाणा शहरातील तहसील चौकात खामगाव आणि चिखली कडे जाणाऱ्या गाड्यांचा थांबा आहे या थांब्यावर प्रवाशांची खुपच गर्दी असते म्हणून येथून बस मध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे पाकीट मारण्याचे प्रकार वाढले होते. नेहमीप्रमाणे काल चिखली कडे जाणारी एक एसटी बस तहसील चौकात थांबली आणि प्रवाशांची बस मध्ये चढण्यासाठी एकच गर्दी झाली याच गर्दीचा फायदा घेत या चारही महिला बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या पिशवीतून तर कुणी पाकिटातून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते. हा सर्व प्रकार पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे यांनी रंगे हाथ पकडला एवढेच नाही तर हा प्रकार आपल्या मोबाईल मध्येही कैद केला, आणि चारही महिलांना अटक केली.