नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी विरार येथे पतीने आपल्या घरच्या देवीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
विरार पूर्वमधील मनवेलपडा येथे चारित्र्याच्या संशयावरून चक्क 60 वर्षीय वृद्धेची तिच्या पतीने हत्या केली. भारती बाबूराव माटे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मूळचं रायगड येथील माटे कुटुंब विरार पूर्वेकडील मनवेल पाडा कारगील नगर येथे गेल्या दीड वर्षांपासून राहत होतं. त्यांना दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. दोन्ही मुली विवाहित होत्या.
भारती आपले पती बाबुराव आणि लहान मुलगा मयूर पाटे याच्या मालकीच्या घरात राहत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून बाबूराव हा भारती यांच्यावर चारित्र्याच्या संशयावरून वाद घालत होता. बुधवारी सकाळी मयूर कामासाठी निघाल्यानंतर पती पत्नीमध्ये वाद सुरू झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की बाबूरावने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली.
हत्या केल्यानंतर बाबूराव स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला आणि स्वतःला अटक करून घेतलं.