Hingoli Earthquake Today Updates : हिंगोली जिल्ह्यामध्ये सातत्याने भूकंपाचे सत्र सुरू असून शनिवारी पुन्हा एकदा नागरिकांना हादरे जाणवले. आज शनिवार 11 जुलै रोजी सकाळी 11:26 वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला. सुदैवाने या भूकंपामुळे जिल्ह्यात कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु सततच्या धक्क्यांमुळे नागरिकांमधील भीती अधिकच वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, शनिवारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली असून, जमिनीच्या आत 5 किलोमीटर खोलीवर याचे केंद्रबिंदू होते.
केंद्रबिंदू बदलत असल्याने जिल्हावासियांमध्ये चिंतेचे वातावरण
याआधी 8 जुलै रोजी मध्यरात्री हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे 4 मोठे धक्के बसले होते. त्यातील सर्वात मोठा धक्का 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता, जो मागील काही वर्षांतील सर्वाधिक क्षमतेचा भूकंप ठरला. यापूर्वीच्या धक्क्यांचे केंद्रबिंदू वेगळ्या भागात होते, मात्र आता केंद्रबिंदूचे ठिकाण बदलल्याने नागरिकांमध्ये नवी चिंता निर्माण झाली आहे. मागील भूकंपांचे केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि औंढा नागनाथ तालुक्यातील काकडधाबा परिसरात नोंदवले गेले होते. शनिवारी झालेल्या ताज्या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातीलच वसई येथे असल्याचे समोर आले आहे. पांगरा शिंदे, काकडधाबा आणि आता वसई अशा वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रबिंदू आढळल्याने भूकंपाचे मुख्य केंद्र हळूहळू पुढे सरकत असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा – Washim News : निकाल लागला अन्… घडलं भयंकर! वाशीममध्ये नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
पांगरा शिंदे गावातील 8 वर्षांचा संघर्ष आणि प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेले पांगरा-शिंदे गाव गेल्या 8 वर्षांपासून भूकंपाच्या छायेत आहे. या गावात सातत्याने जमिनीतून आवाज येथे आणि सौम्य हादरे बसणे अशा घटना घडत असल्याने येथील ग्रामस्थ दीर्घकाळापासून प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत. 8 जुलैच्या मोठ्या धक्क्यांनंतर नागरिक अजून सावरलेही नव्हते, तोच शनिवारी पुन्हा नवीन हादरा बसल्याने संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रण ठेवताना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून, कोणीही घाबरून न जाता सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar : एसआयआर प्रक्रियेचा ताण असह्य! भर बैठकीत शिक्षकाला रडू कोसळलं; Video Viral
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.