Sunil Gavaskar: मोठा निर्णय! सुनील गावस्कर यांच्याबाबत बनावट कंटेंट हटवण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

सोशल मीडियावर आणि ऑनलाइन माध्यमांवर परवानगीशिवाय वापरण्यात येणारा बनावट, दिशाभूल करणारा आणि आक्षेपार्ह कंटेंट तातडीने हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.<br/>
Sunil Gavaskar: मोठा निर्णय!  सुनील गावस्कर यांच्याबाबत बनावट कंटेंट हटवण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

Sunil Gavaskar: दिल्ली उच्च न्यायालयाने माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि सर्च इंजिन्सना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावर आणि ऑनलाइन माध्यमांवर परवानगीशिवाय वापरण्यात येणारा बनावट, दिशाभूल करणारा आणि आक्षेपार्ह कंटेंट तातडीने हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुनील गावस्कर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने गुगल, मेटा (फेसबुक-इन्स्टाग्राम) आणि एक्स (माजी ट्विटर) यांना मध्यस्थ म्हणून जबाबदारी पार पाडण्याचे निर्देश दिले. गावस्कर यांनी त्यांच्या नावाचा, ओळखीचा आणि छायाचित्रांचा गैरवापर करून सोशल मीडियावर खोटी माहिती, बनावट विधाने आणि फसवणूक करणारा मजकूर प्रसारित केला जात असल्याचा आरोप केला होता. या प्रकारामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती मनमीत प्रीतम अरोरा यांनी स्पष्ट केले की, अशा स्वरूपाच्या तक्रारींमध्ये प्रथम आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी संबंधित डिजिटल मध्यस्थांशी संपर्क साधणे ही निश्चित प्रक्रिया आहे. त्यानुसार, सुनील गावस्कर यांनी संबंधित बनावट कंटेंटचे नेमके URL मध्यस्थांना उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. हे URL मिळाल्यानंतर संबंधित प्लॅटफॉर्म्सनी एका आठवड्याच्या आत त्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा  – Lionel Messi: कोलकात्यात मेस्सी दौऱ्यादरम्यान चाहत्यांचा मोठा गोंधळ; खुर्च्या आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, प्रतिवादी क्रमांक 7, 10 आणि 11 यांनी ही बाब औपचारिक तक्रार म्हणून स्वीकारून सात दिवसांच्या आत निर्णय घ्यावा. तसेच, याचिकाकर्त्यांनी पुढील 48 तासांत संबंधित URL सादर करावेत आणि मध्यस्थांनी एका आठवड्यात आपल्या निर्णयाची माहिती द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सुनील गावस्कर यांनी दाखल केलेल्या याचिकेत, त्यांच्या नावाने भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर तसेच अन्य क्रिकेटपटूंविषयी खोट्या, अपमानास्पद आणि निराधार टिप्पण्या पसरवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये विराट कोहलीबाबतही बनावट विधाने प्रसारित करण्यात आल्याचा उल्लेख आहे.

हेही वाचा – Cricket Match Fixing: क्रिकेटविश्वात खळबळ! मॅच फिक्सिंगप्रकरणी चार खेळाडूंविरोधात FIR, नेमकं प्रकरण काय?

याशिवाय, गावस्कर यांच्या बनावट स्वाक्षरीसह उत्पादने आणि छायाचित्रांचा वापर करून ऑनलाइन विक्री केल्याच्या अनेक घटना समोर आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या माध्यमातून चाहत्यांची फसवणूक होत असून, या उत्पादनांचा सुनील गावस्कर यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दिलेले निर्देश हे डिजिटल फसवणूक आणि व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version