अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षाचा फटका पुन्हा एकदा भारतीय खलाशांना बसला आहे.होर्मुझ सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. अमेरिके-इराण तणावामुळे आखाती प्रदेशात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा हा आणखी एक गंभीर परिणाम मानला जात आहे.
हेरंब करमरकर हे व्यापारी जहाजावर थर्ड इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. सुट्टी मंजूर झाल्यामुळे ते लवकरच भारतात परतणार होते. घटनेच्या काही वेळापूर्वी त्यांनी कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला होता. घरी परतल्यानंतरचे नियोजनही त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही मिनिटांतच जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यामुळे त्यांच्याशी संपर्क तुटला.
हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन विभागात मोठी आग लागली. बचावकार्य सुरू असतानाच काही कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामध्ये हेरंब यांचाही समावेश होता. त्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली आणि अखेर त्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती कुटुंबीयांना देण्यात आली.होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वाधिक वर्दळीच्या सागरी मार्गांपैकी एक मानला जातो. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिके आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे या परिसरातील सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीवरही परिणाम होत असून, विविध देशांनी आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
हेरंब यांच्या निधनाची बातमी पुण्यात पोहोचताच कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली. काही दिवसांनंतर घरात आनंदाचे वातावरण असेल, अशी अपेक्षा असलेल्या कुटुंबावर एका क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पार्थिवाला भारतात आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असून, यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय दूतावासाकडून समन्वय साधला जात आहे. अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम केवळ पश्चिम आशियापुरता मर्यादित न राहता भारतीय नागरिकांवरही होत असल्याची ही घटना पुन्हा अधोरेखित करत आहे. आखाती प्रदेशात कार्यरत भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.