गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिक चिंतेत आले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. अशातच आज 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना पावसाने देखील पुनरागमन केले आहे. आज पावसासाठी हवामान प्रणाली सक्रिय होताना पाहायला मिळत आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये पुढील दोन दिवस चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. जून-जुलैनंतर ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. त्यामुळे बळीराजा संकटात आहे. अशातच आता गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.
14 आणि 15 सप्टेंबर रोजी अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
यावेळी मुंबईसह पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाने पुन्हा काही प्रमाणात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
त्याचसोबत आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्यासह आसपासच्या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तर राज्यातील उर्वरीत जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.