जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट; तापमान 41 अंशांवर

जालना जिल्ह्यात तापमानाने 41 अंश गाठले; पुढील तीन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन.

जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट; तापमान 41 अंशांवर

जालना :एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत चालला असून, जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने उष्णतेचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात उष्णतेचं प्रमाण  वाढू लागलं आहे. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

यलो अलर्ट म्हणजे संभाव्य उष्णतेची स्थिती, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं. जालन्यात आतापर्यंतचे तापमान 36 ते 38 डिग्री सेल्सियस दरम्यान राहिलं होतं. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमानाने 41अंश सेल्सियसचा टप्पा गाठल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते आणि दुपारी तर घराबाहेर पडणं कठीण होऊन जातं.

या अचानक वाढलेल्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे दिसून येत आहे. बाजारपेठा, रस्ते, बस स्थानकं आणि इतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. दुपारच्या वेळात रस्ते निर्मनुष्य होऊ लागले असून, नागरिक उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी घरातच राहणं पसंत करत आहेत.

प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. शक्य तितकं वेळ घरातच काढा. घराबाहेर पडताना डोकं झाकलेलं ठेवा, पाण्याचं सेवन सातत्याने करा आणि थेट सूर्यप्रकाशापासून स्वतःचा बचाव करा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

हेही वाचा :जोरात बोलणं बेतलं जीवावर; आयपीएल मॅच दरम्यान कांदिवलीत तरुणाची हत्या

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागालाही सतर्क करण्यात आलं आहे. उष्माघात, डिहायड्रेशन, थकवा यासारख्या समस्यांपासून बचावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधं व उपाययोजना ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांनाही ही उष्णता मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. शेतात काम करणं अशक्य होत चाललं असून, पिकांवरही उष्णतेचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पशुधनासाठीही पुरेशा पाण्याची व सावलीची व्यवस्था करण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे.

जालना जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील तीन दिवस अत्यंत सतर्क राहावं, प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात आणि गरज असल्यासच घराबाहेर पडावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number