PM Modi Fuel Saving Appeal : मध्य पूर्वेतील देशांमध्ये (West Asia) गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचे संकट गहिरे झाले आहे. या पार्श्वभूमीवर परकीय गंगाजळी आणि इंधनाची बचत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच कॉर्पोरेट कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' (WFH) देण्याचे विशेष आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी (HDFC) बँकेने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बँकेने आपल्या कॉर्पोरेट आणि बॅक-एंड टीमसाठी आठवड्यातून 2 दिवस घरून काम करण्याची परवानगी देणारी नवीन अधिकृत पॉलिसी जाहीर केली आहे.
30 दिवसांचा प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प; 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार सुवर्णसंधी
एचडीएफसी बँक सुरुवातीला 30 दिवसांसाठी हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर (Trial Basis) राबवणार असून त्यानंतर या धोरणाचा आढावा घेतला जाईल. बँकेच्या वरिष्ठ पातळीवर या विषयावर दीर्घकाळापासून चर्चा सुरू होती, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, ही सुविधा केवळ 'बिझनेस एनेबलिंग' आणि 'कॉर्पोरेट एनेबलिंग' विभागातील कर्मचाऱ्यांसाठीच लागू असेल. यामध्ये आयटी (IT), फायनान्स, ऑपरेशन्स, ट्रेझरी ऑपरेशन्स, लीगल, ह्युमन रिसोर्सेस (HR) आणि रिस्क मॅनेजमेंट यांसारख्या बॅक-एंड आणि अंतर्गत विभागांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.
ग्राहक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही; नियमित काम सुरू राहणार
एचडीएफसी बँकेकडे देशभरात सुमारे 2,00,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे मोठे जाळे आहे. बँकेने स्पष्ट केले आहे की, या वर्क फ्रॉम होमच्या निर्णयाचा बँकेच्या दैनंदिन ग्राहक सेवांवर अजिबात परिणाम होणार नाही. ग्राहकांशी थेट संपर्क येणारे सर्व कर्मचारी, जसे की ब्रँच स्टाफ, रिलेशनशिप मॅनेजर्स, कॅशियर (Tellers) आणि लोन ऑफिसर्स यांना नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहावे लागेल. देशातील सर्व शाखा नियमितपणे सुरू राहतील, जेणेकरून 9.7 कोटींहून अधिक ग्राहकांना कोणतीही अडचण भासणार नाही.
इंधन बचतीसाठी 'आर्थिक देशभक्ती' दाखवण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
भारताला आपल्या गरजेच्या जवळपास 80 ते 90 टक्के खनिज तेल इतर देशांतून आयात करावे लागते. सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलाचे भाव गगनाला भिडले असून परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधानांनी देशवासीयांना पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचे आणि अनावश्यक परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केले होते. 11.6 ते 12.9 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल (Market Cap) असणारी आणि जगातील पहिल्या 10 बँकांमध्ये स्थान मिळवणारी एचडीएफसी बँक ही मोदींच्या या आवाहनानंतर हायब्रिड मॉडेल अधिकृतपणे लागू करणारी पहिली मोठी खाजगी बँक ठरली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.