हरियाणा : प्रसिद्ध रॅपर-गायक बादशाह याने आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया, त्याच्या 'टटीरी' या नवीन गाण्यामुळे चर्चेत आला. या गाण्यात महिला आणि अल्पवयीन मुलांबद्दल आक्षेपार्ह शब्द असल्याचा आरोप अनेकांनी केल्यामुळे, त्यावर तीव्र टीका झाली. तीव्र टीका झाल्यानंतर बादशाहने माफी मागितली आणि हे गाणे सर्व प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा पोलिसांनी 'टटीरी' या वादग्रस्त गाण्याविरोधात कारवाई तीव्र केली असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील शेकडो लिंक्स काढून टाकल्या आहेत.
हरियाणा पोलिसांनी सोशल मीडियावरून गाण्याच्या लिंक्स हटवल्या
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 857 लिंक्स हटवण्यात आल्या आहेत. ज्यात यूट्यूबवरील 154 व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवरील 703 रील्सचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटीस पाठवून गाण्याच्या सर्व आवृत्त्या, ज्यात पुन्हा अपलोड केलेले व्हिडिओ आणि लहान क्लिप्स यांचा समावेश आहे. ते काढून टाकण्याचे निर्देश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हरियाणाचे पोलीस महासंचालक अजय सिंघल यांनी यावर जोर दिला की, राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलांच्या प्रतिष्ठेला कमी लेखणारी कोणतीही सामग्री खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये, संबंधित सोशल मीडिया खाती ब्लॉक किंवा प्रतिबंधित केली जाऊ शकतात. तसेच वारंवार गुन्हा करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला जाईल.
अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना बंदी घातलेले गाणे शेअर करण्यापासून किंवा त्यासंबंधी सामग्री तयार करण्यापासून सावध केले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक शिबास कबीराज यांनी सांगितले की, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या कृतीत गुंतलेली सोशल मीडिया खाती ब्लॉक केली जाऊ शकतात. तसेच वारंवार गुन्हा करणाऱ्यांना गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. पंचकुला येथील सेक्टर-20 मधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस पथके या गाण्याशी संबंधित ऑनलाइन हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ते शेअर करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवत आहेत. 'टटीरी' हे एक हरियाणवी हिप-हॉप गाण आहे. जे 1 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झाले. हे गाणे रॅपर-गायक बादशाहने गायिका सिमरन जगलानसोबत गायले आहे. या गाण्याचे बोल बादशाहने लिहिले आहेत. तर संगीत हितेनने दिले असून त्यानेच त्याचे संगीत दिग्दर्शनही केले आहे. या गाण्यात समकालीन रॅपचे घटक आणि प्रादेशिक प्रभाव यांचा मिलाफ आहे. याचा अधिकृत म्युझिक व्हिडिओ माही संधू आणि जोबन संधू यांनी दिग्दर्शित केला आहे.
गेल्या आठवड्यात, राष्ट्रीय महिला आयोगाने अश्लीलता आणि असभ्यतेच्या आरोपावरून बादशाह आणि गाण्याच्या निर्मात्यांना समन्स बजावले. आयोगाने म्हटले आहे की, गाण्यातील मजकूर प्रथमदर्शनी आक्षेपार्ह असून तो भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि महिलांचे अश्लील चित्रण (प्रतिबंध) कायदा, 1986 अंतर्गत असलेल्या तरतुदींचे उल्लंघन करणारा असल्याचे दिसून येते.