Harry Potter Web Series First Look Released : जगभरातील 'पॉटरहेड्स' (हॅरी पॉटरचे चाहते) ज्या क्षणाची अनेक वर्षांपासून वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. HBO Max ने आपल्या बहुप्रतिक्षित 'हॅरी पॉटर' वेब सिरीजची पहिली झलक (First Look) प्रदर्शित केली असून, यामुळे अनेकांच्या लहानपणी पाहिलेल्या हॅरीच्या जादुई जगाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. या टीझरमध्ये हॉगवर्ट्सच्या प्रतिष्ठित वास्तू आणि क्विडिच पिचचे विलोभनीय दृश्य दाखवण्यात आले आहे.
पुस्तकांचे सविस्तर आणि भव्य रूपांतर
ही नवीन वेब सिरीज जे.के. रोलिंग यांच्या मूळ पुस्तकांचे अत्यंत 'प्रामाणिक रूपांतर' असेल, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. चित्रपटांच्या शृंखलेत वेळेअभावी ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी आणि उपकथानके वगळली गेली होती, त्यांना आता या लॉंग-फॉरमॅट वेब सिरीजमध्ये विस्ताराने स्थान दिले जाईल. आधुनिक VFX तंत्रज्ञानाचा वापर करून ही जादुई दुनिया पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि वास्तववादी बनवण्याचा वार्नर ब्रदर्सचा मानस आहे. यामुळे हॅरी पॉटरचे चित्रपट आवडीने पाहणाऱ्या जुन्या चाहत्यांना नवी मेजवानी मिळणार आहे.
नवीन कलाकार आणि दशकाचा प्रकल्प
या सिरीजमध्ये एक पूर्णपणे नवीन स्टार कास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिपोर्टनुसार, डोमिनिक मॅकलॉफ्लिन (Dominic McLaughlin) हॅरी पॉटरच्या मुख्य भूमिकेत दिसू शकतो, तर रॉन, हर्मिओनी आणि डंबलडोर यांसारख्या पात्रांसाठीही नवीन कलाकारांची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हा प्रोजेक्ट पुढील 10 वर्षांपर्यंत चालणारा असून, या सिरीजचा प्रत्येक सीझन हा हॅरी पॉटरच्या एका विशिष्ट पुस्तकावर आधारित असणार आहे. मूळ लेखिका जे.के. रोलिंग स्वतः या प्रकल्पात एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहेत.
चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
हॅरी पॉटरच्या या पुनरागमनाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनेक चाहते पुन्हा एकदा हॉगवर्ट्सचे दरवाजे उघडणार असल्याने उत्साही आहेत, तर काही जुन्या कलाकारांच्या (डॅनियल रॅडक्लिफ, एम्मा वॉटसन आणि रूपर्ट ग्रिंट) आठवणीत भावूक झाले आहेत आणि त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही, असेही त्यांचे मत आहे. तर "कलाकार बदलले तरी हॉगवर्ट्स हे आमचे कायमचे घर असेल," अशा भावना काही चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. ही सिरीज केवळ जुन्या चाहत्यांनाच नाही, तर नवीन पिढीलाही या अद्भूत जादूई जगाची ओळख करून देणार आहे. यामुळे या वेब सीरीजचे दर्शक केवळ लहान मुले राहणार नसून हॅरीची भूमिका अजरामर केलेल्या डॅनियल रॅडक्लिफची समवयस्क पिढीही असणार आहे. हॅरी, हर्मिओनी, रॉन यांचा नवा अवतार प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतो का, हे येत्या काळात समजेल.
हेही वाचा – Atul Kulkarni on Ashok Kharat: 'पकडले गेले तरच भोंदू का?'; अशोक खरात प्रकरणी अतुल कुलकर्णींचा परखड सवाल
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.