Grahan Yog Astrological Impacts : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना अत्यंत महत्त्व असते आणि 10 मे रोजी असाच एक नकारात्मक योग जुळून येत आहे. या दिवशी दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनी चंद्र आपली राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत आधीपासूनच राहूचे वास्तव्य असल्याने, या दोन ग्रहांच्या मिलाफातून 'ग्रहण योग' निर्माण होत आहे. हा योग ज्योतिषीय दृष्टिकोनातून शुभ मानला जात नाही, ज्याचा परिणाम प्रामुख्याने 3 राशींवर नकारात्मक होऊ शकतो.
मेष राशी (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी हा ग्रहण योग लाभ स्थानात तयार होत आहे, ज्यामुळे मिळणाऱ्या लाभात किंवा येणाऱ्या नफ्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही परदेशी व्यापारात असाल किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असाल, तर प्रत्येक पाऊल जपून टाकणे हिताचे ठरेल. तुमची एक छोटीशी चूक आर्थिक नुकसानाला निमंत्रण देऊ शकते. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी विनाकारण वाद घालणे टाळा, अन्यथा तुमच्या सामाजिक प्रतिमेला तडा जाऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवण्याची शक्यता आहे.
उपाय: नकारात्मकता दूर करण्यासाठी तांदूळ, साखर, दूध अशा पांढऱ्या वस्तूंचे किंवा पांढऱ्या कपड्यांचे दान करावे.
हेही वाचा – Adhik Maas 2026: यंदा अधिक मास! आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी; जाणून घ्या दानधर्म, मुहूर्त आणि महत्त्व
कन्या राशी (Virgo)
कन्या राशीच्या व्यक्तींच्या सहाव्या भावात हा अशुभ योग बनत आहे. यामुळे तुमचे गुप्त शत्रू किंवा विरोधक डोके वर काढू शकतात आणि तुमच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक बाबतीत विशेष सतर्कता बाळगा, कारण अनावश्यक खर्च वाढल्याने तुमची जमापुंजी खर्च होऊ शकते. घरामध्येही तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता असल्याने संयम ठेवावा.
उपाय: संकटांपासून बचावासाठी नियमितपणे भगवान शिवाची उपासना करावी आणि शिवपंचाक्षरी मंत्राचा जप आणि शिवपंचाक्षर स्तोत्राचा पाठ करावा.
मीन राशी (Pisces)
मीन राशीच्या जातकांसाठी ग्रहण योगाचा काळ करिअर आणि शिक्षणाच्या दृष्टीने आव्हानात्मक असू शकतो. तुमच्या सुरू असलेल्या कामांमध्ये अचानक अडथळे येतील, अशा वेळी संयम न गमावता पुढे जाणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, कारण फसवणुकीची दाट शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महाग पडू शकते.
उपाय: अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करावे. तसेच, शिवपंचाक्षरी मंत्राचा जप आणि शिवपंचाक्षर स्तोत्राचा पाठ करावा.
हेही वाचा – Kailash Mansarovar Yatra 2026: कैलास मानसरोवर यात्रेसाठी नोंदणी सुरू; अर्ज करण्याची पद्धत आणि अटी जाणून घ्या
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.