4 Day Week: भारतात 4 दिवसांचा कामाचा आठवडा आणि 3 दिवसांची सुट्टी लागू होणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वाढता कामाचा ताण आणि वर्क-लाईफ बॅलन्सच्या मागणीमुळे अनेक कर्मचारी आठवड्यातून फक्त चार दिवस काम करण्याच्या पर्यायाकडे पाहत आहेत. जपान, स्पेन आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये काही कंपन्यांनी आधीच 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा प्रयोग सुरू केला आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतातही हे शक्य आहे का, याबाबत सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.
कामगार मंत्रालयाची भूमिका काय?
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 12 डिसेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत या विषयावर स्पष्टता दिली. मंत्रालयानुसार, नवीन कामगार कायद्यांनुसार आठवड्याला जास्तीत जास्त 48 तास काम करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याच मर्यादेत राहून कंपन्यांना कामाचे वेळापत्रक ठरवण्याची मुभा आहे. मंत्रालयाच्या ‘मिथबस्टर’ पोस्टमध्ये सांगण्यात आले की, सुधारित कामगार संहितांनुसार दिवसाला 12 तासांच्या शिफ्टचे लवचिक वेळापत्रक शक्य आहे. म्हणजेच, एखादी कंपनी जर दिवसाला 12 तास काम घेण्यास तयार असेल, तर कर्मचारी आठवड्यातून फक्त चार दिवस काम करून उर्वरित तीन दिवस पगारी सुट्टी घेऊ शकतात.
हेही वाचा – Manali Trip Scam: मनाली ट्रिप की स्कॅम ट्रिप? बर्फाच्या नावाखाली पर्यटकांची दिशाभूल, Video Viral
12 तासांच्या शिफ्टमध्ये ब्रेकही अनिवार्य
कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की 12 तासांच्या शिफ्टमध्ये ब्रेक किंवा ‘स्प्रेड-ओव्हर’चा समावेश असेल. तसेच, जर एखाद्या कर्मचाऱ्याला आठवड्याला 48 तासांपेक्षा जास्त किंवा ठरवलेल्या दैनंदिन तासांपेक्षा जास्त काम करावे लागले, तर त्या अतिरिक्त कामासाठी दुप्पट वेतन (ओव्हरटाईम) देणे कंपन्यांना बंधनकारक असेल.
तुमची कंपनी परवानगी देईल का?
महत्त्वाचे म्हणजे, 4 दिवसांचा आठवडा हा पर्याय कायद्याने शक्य असला तरी तो सक्तीचा नाही. अंतिम निर्णय संबंधित कंपनी, कार्यालय किंवा संस्थेच्या धोरणांवर अवलंबून असेल. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळेलच असे नाही.
हेही वाचा – IRCTC वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, बनावट ओळखपत्रांबाबत सरकारचा कठोर निर्णय
The Labour Codes allow flexibility of 12 hours for 4 workdays only, with the remaining 3 days as paid holidays.
Weekly work hours remain fixed at 48 hours and overtime beyond daily hours must be paid at double the wage rate.#ShramevJayate pic.twitter.com/5udPMqRXbg — Ministry of Labour & Employment, GoI (@LabourMinistry) December 12, 2025
नवीन कामगार संहिता काय आहेत?
21 नोव्हेंबर 2025 रोजी भारत सरकारने 29 जुने कामगार कायदे रद्द करून चार नवीन कामगार संहिता लागू केल्या. यामध्ये वेतन संहिता, 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता 2020 चा समावेश आहे. या संहितांचा उद्देश कर्मचाऱ्यांचे हक्क अधिक स्पष्ट करणे आणि कामाच्या ठिकाणी लवचिकता वाढवणे हा आहे. त्यामुळे भारतामध्ये 4 दिवसांचा कामाचा आठवडा कायद्याने शक्य असला तरी तो सर्वांसाठी आपोआप लागू होणार नाही. कंपन्यांनी 48 तासांच्या आठवड्याच्या मर्यादेत राहून निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे भविष्यात काही क्षेत्रांमध्ये 4 दिवसांचा आठवडा प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.