Govandi: गोवंडीत माथेफिरू ‘कॅट-किलर’चा वावर? 3 दिवसांत 6 मांजरी संपवल्या, नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या गोवंडीत पांजरापोळ परिसरात काही दिवसांत 6 मांजरी मृतावस्थेत आढळल्या. जखमांच्या खुणांमुळे हत्या झाल्याचा संशय असून आरसीएफ पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

Govandi: गोवंडीत माथेफिरू ‘कॅट-किलर’चा वावर? 3 दिवसांत 6 मांजरी संपवल्या, नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या गोवंडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पांजरापोळ परिसरात अवघ्या काही दिवसांत 6 मांजरी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मांजरींचे मृतदेह जखमी आणि विद्रूप अवस्थेत आढळून आल्याने त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी प्राणीप्रेमी रुबिना पठाण यांच्या तक्रारीनंतर आरसीएफ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर रोजी पांजरापोळ परिसरात एकाच ठिकाणी तब्बल 4 मांजरी मृतावस्थेत आढळल्या. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी याच परिसरात आणखी 2 मांजरींचे मृतदेह सापडले. सलग दोन घटनांमध्ये 6 मांजरींचा मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, मांजरींच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. त्यापैकी एका मांजराच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्या मांजराच्या शरीरावरही मारहाणीच्या खुणा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मांजरींचा नैसर्गिक मृत्यू नसून त्यांना जाणीवपूर्वक मारण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

या घटनेनंतर परिसरात अज्ञात व्यक्तीकडून मांजरींना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर या व्यक्तीला 'कॅट-किलर' म्हटले जात असले तरी पोलिस तपास पूर्ण होण्यापूर्वी आरोपीबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.

आरसीएफ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएस कलम ३२५ तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, या घटनांमागे नेमके कोण आहे आणि मांजरींच्या मृत्यूचे कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, एकाच परिसरात काही दिवसांच्या अंतराने 6 मांजरी मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number