गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गाची सध्या अत्यंत खराब अवस्था झाली असून शिरपूर ते कोहमारा दरम्यान पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. मासुलकसा घाट परिसरात खड्ड्यांमुळे दोन वेगवेगळ्या कार उलटल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरकडून दुर्गच्या दिशेने जाणारी एक कार मासुलकसा घाट परिसरातून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्यावर उलटली. अपघाताची तीव्रता मोठी असली तरी कारमधील प्रवाशांना सुदैवाने गंभीर इजा झाली नाही. मात्र, वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याच मार्गावर दुसरी घटना मुरदोलीजवळ घडली. लाखनीकडून देवरीच्या दिशेने शहारे कुटुंबीयांची कार जात होती. त्यावेळी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कारचा समतोल बिघडला आणि वाहन उलटले. या अपघातातही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने कारमधील व्यक्तींचा जीव वाचला.
या दोन्ही घटनांनंतर राष्ट्रीय महामार्गाच्या देखभालीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिरपूर ते कोहमारा या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था खराब असून खड्ड्यांमुळे वाहनचालकांना सतत धोका पत्करावा लागत असल्याची तक्रार आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढतो.
महामार्गाची देखभाल करणाऱ्या संबंधित यंत्रणेने रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.