Girish Mahajan On Mumbai Rain : मुंबईत आणि राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर, ‘पावसाचा आनंद घेण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नका, नाहीतर पोलिसांना सक्ती करावी लागेल; कृपया सरकारला सहकार्य करा,’ असा कडक इशारा मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना दिला आहे. ते म्हणाले की, जर लोक स्वतःहून ऐकणार नसतील, तर पोलिसांना सक्तीचा वापर करून लोकांना थांबवावे लागेल. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.
पर्यटनाच्या नावाखाली जीवाला धोका पत्करू नका
राज्यात आणि विशेषतः मुंबईत सध्या निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक अशा भयानक परिस्थितीतही पावसाची मजा लुटण्यासाठी किंवा धबधबे पाहण्यासाठी घराबाहेर पडत आहेत, जे अत्यंत धोकादायक आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या काही भागात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. अशा वेळी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून कंपन्यांना वर्क फ्रॉम होम देण्यास सांगितले आहे. तरीही लोक पर्यटनासाठी बाहेर पडत असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी संताप व्यक्त केला आहे.
वेगवान वारे आणि वाहतूक ठप्प
सध्या हवेचा वेग प्रचंड वाढला असून रविवारी 50-60 किमी प्रतितास असणारा वाऱ्याचा वेग आज 70-90 किमी प्रतितास इतका झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडत असल्याने झाडांखाली उभे राहणे किंवा प्रवास करणे जीवितहानीला आमंत्रण देणारे ठरू शकते. मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गासह पालघर, रायगड आणि मुंबईतील रस्ते वाहतूक पूर्णपणे विसकळीत झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तातडीची बैठक बोलावली असून पुढील उपाययोजनांचे नियोजन केले जात आहे. काही तरुणांना धबधब्यांवर आपला जीव गमवावा लागल्याने गिरीश महाजन यांनी नागरिकांना वारंवार घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
संकटकाळात राजकारण नको, विरोधकांना आवाहन
ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याने अशा गंभीर परिस्थितीत राजकीय चिखलफेक करणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत गिरीश महाजन यांनी मांडले. विरोधकांनी या काळात जनतेमध्ये संभ्रम किंवा भीती निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये. लोकांच्या जीवाचे रक्षण करणे ही सध्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. महाजन यांनी विरोधकांना सल्ला दिला की, आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी भविष्यात खूप वेळ मिळेल; परंतु, सध्या एकत्र येऊन या संकटाचा सामना करण्याची आणि सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.